लोणीकंद : आम्ही आता गुलामगिरी करणार नाही. दलित समाजाला सत्तेची जमात व्हायचे असेल तर आता राहुट्या टाकण्याचे बंद करा, सर्व दलित गटातटाने एकत्र या, मी तुमच्यात येतो. आता दलित समाजाच्या उत्कर्षासाठी एकत्र या, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले.पेरणे फाटा (ता. हवेली) पुणे नगर रस्त्यावरील ऐतिहासिक विजय रणस्तंभ द्विशताब्दी वर्षानिमित्त मानवंदना सभेमध्ये आठवले बोलत होते. प्रारंभी पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार अमर साबळे यांनी विजय रणस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. प्रांगणामध्ये अभिवादन सभा झाली. अध्यक्षस्थानी एम. डी. शेलार होते. खासदार अमर साबळे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश सुळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, काकासाहेब कळमकर, राजाभाऊ सरोदे, महेश शिंदे, हनुमंत साठे, सूर्यकांत वाघमारे, बाळासोा जानराव, शैलेश चव्हाण, सरपंच सागर गायकवाड आदी उपस्थित होते.आम्ही मराठेविरोधात नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीला आमचा पाठिंबा आहे. केंद्र सरकारकडे आम्ही ही मागणी करत आहे. आपल्यात वाद नाही. खरे तर मराठे आणि दलित एकत्र आले पाहिजे, तर आपण स्वराज्य निर्माण करू. कोरेगाव भीमा विजयस्तंभाचा इतिहास आम्हाला प्रेरणादायी आहे. या शहीद जवानाचे भव्य दिव्य स्मारक उभे करू, असे आठवले म्हणाले. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रास्ताविक केले. खासदार अमर साबळे म्हणाले, की इतिहास निर्माण करण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाने युद्ध आणि बुद्ध निवड करायची वेळ आली तर बुद्धाचा शांतीचा मार्ग जगाला स्वीकारावा लागेल. वढू बुद्रुक येथील गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करू. संगमरवरी स्मारक उभे करू. सर्वांनी उभे राहून शहीद जवानांना मानवंदना दिली.विजयस्तंभास आज मानवंदना; जय्यत तयारीपेरणेफाटा : येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून आंबेडकरी बांधव येण्यास सुरुवात झाली आहे. यानिमित्त विजयस्तंभ व परिसराला फुलांची सजावट करण्यात आली असून तयारी पूर्ण केली आहे.विजयस्तंभाच्या चारही बाजुंना लाकडी चढ-उतार पायºयाची व्यवस्था, स्वच्छता, वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरते शौचालय आदी व्यवस्था प्रशासन व पेरणे ग्रामपंचायतीने केली आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ सेवा संघाच्या वतीने स्तंभाला फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.वाहतुकीच्या नियोजनातही बदल करण्यात आला असून एक जानेवारीला दिवसभर नगर रस्त्यावर शिक्रापूर ते वाघोली या पट्ट्यात जड वाहनांस बंदी करण्यात आली आहे. अहमदनगरकडे जाणारी जड वाहने चौफूला मार्गे तर पुण्याकडे जाणारी वाहने चाकण रस्त्याने वळविण्यात आली आहेत. पुण्याकडून येणाºया बसेससाठी पेरणे टोलनाक्याजवळ तर नगरकडून येणाºया बसेससाठी कोरेगाव भीमा हद्दीत पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. ४०० पोलीस, १०० होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या, दंगल नियंत्रण पथक बंदोबस्तासाठी तैनात आहे.
दलितांच्या उत्कर्षासाठी सर्वांनी एकत्र या! रामदास आठवलेंचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 4:20 AM