पुणे : डॉ. आ. ह. साळुंखे यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा ही चिकित्सा, जिज्ञासा आणि ज्ञानलालसेमधून आलेली असून अभ्यासपूर्ण शैलीतून त्यांनी समाजाचा विद्रोह मांडला. त्यांचे ग्रंथ विचार प्रवर्तक आहेत. जाणकारांनी न्याय न दिलेल्या आणि दुर्लक्षित घटकांबद्दल त्यांनी लिखाण केले. ते खºया अर्थाने धर्मचिकित्सक असल्याचे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.पवार यांच्या हस्ते साळुंखे यांना अमृत महोत्सवानिमित्त तुकाराम पगडी घालून सत्कार करण्यात आला. मानपत्र, शाल देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर, माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यामधून आलेल्या साळुंखे यांची वाटचाल प्रेरणादायी आहे. त्यांना कोणतीही शैक्षणिक अथवा अन्य पार्श्वभूमी नाही. साहित्य संस्कृतीमधील त्यांचे योगदान मात्र मोठे आहे. त्यांच्याबद्दल केवळ अभिमानच नाही तर नतमस्तक व्हावेसे वाटते. वैदिक परंपरेला विरोध दर्शवित बहुजनांची सांस्कृतिक गुलामगिरीमधून मुक्तता करणारे लिखाण त्यांनी केले. ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’ या पुस्तकातील एक उतारा वाचून पवार यांनी भाषणाचा समारोप केला.साळुंखे म्हणाले, वारकरी परंपरेमधून मी आलेलो असून महात्मा बसवेश्वरांचे वचन ‘हा कोणाचा हा कोणाचा असे म्हणण्यापेक्षा हा आमचा हा आमचा असे म्हणावे’ हे कायम प्रेरणा देते. जाणिवपूर्वक संस्कृत शिकलो. चार्वाकामुळे वैचारिक लेखनाकडे वळलो. तरुणांनी लहानपणापासून जिज्ञासा जपली पाहिले. प्रबळ इच्छाशक्ती असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कामामध्ये चिकीत्सक दृष्टीकोन बाळगायला हवा.शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरुन कवी परमानंद यांनी संस्कृतमध्ये ‘शिवभारत’ नावाचे काव्य लिहिले. त्यामध्ये शहाजी राजेंचे मोठेपण आले आहे. मात्र, काही इतिहासकारांनी शहाजी राजांविषयी चुकीचे लिहिले आहे. इतिहासाचे न्याय्य आणि विधायक लिखाण आवश्यक आहे, खोट्याला खोट्याने उत्तर देऊ नका, असेही डॉ. साळुंखे म्हणाले.
आ. ह. साळुंखेंनी समाजविद्रोह मांडला : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 3:13 AM