पुणे : आयुष्यात काही मिळवलं, काही केलं तर काही करायचं राहून गेलं. विनोदी लेखन करणे हा माझा आवडीचा प्रांत. मराठी साहित्यामध्ये आज एकही विनोदी कादंबरी नाही, तशी एखादी कांदंबरी व विनोदी नाटक लिहिण्याची खूप इच्छा होती. पण मनात पूर्ण झाल्याशिवाय ते कागदावर उतरत नाही, त्यामुळे ही इच्छा अपूर्णच राहिली. ते लिहिणं आजवर जमलं नाही आणि पुढे होण्याची शक्यता नसल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक द.मा मिरासदार यांनी व्यक्त केली. आपल्या खुमासदार शैलीतील लेखनाबरोबरच कथाकथाकथनाच्या माध्यमातून वाचक आणि श्रोतेजनांवर ‘मिरासदारी’ ची पकड अधिक घट्ट करणारे सर्वांचे लाडके द.मा यांनी गुरूवारी 90 व्या वर्षात पदार्पण केले. आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्यासह साहित्य विश्वातील लेखक, वाचकांकडून त्यांच्यावर काल अभिष्टचिंतनाचा वर्षाव झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. द. मा. म्हणाले, ‘‘चिं.वि जोशी हे आपले अत्यंत आवडते लेखक. सशक्त लेखनातून उत्तमोत्तम विनोदी साहित्याची निर्मिती त्यांनी केली असली तरी ते कधी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, याचे वाईट वाटते. य्नवोदितांना काय सल्ला द्याल असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो, मात्र प्रत्येकाने एकलव्यासारखी विद्या आत्मसात करावी असे मला वाटते. चांगल्या लेखकाचे पुस्तक समोर ठेवावे आणि त्यातील काय भावले, ते चांगले का आहे, याचे स्वत:च आत्मपरीक्षण करावे,याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता फक्त वाचन करतो, कारण करण्यासारखे आता काही उरले नाही. तब्येतीने साथ दिली पाहिजे. दिवसाला तीन ते चार तास वाचन करतो. चांगल्या इंग्रजी कादंब-्या मराठीत आल्या आहेत, त्या वाचून काढतो, असा दिनक्रम असल्याचे सांगितले. द.मां नी विनोद आणि वक्तृत्वाच्या सूत्राची मांडणी केली. ते म्हणाले, जीवनात दु:ख टाळता येत नाहीत, दु:ख नाहीसे करण्याची शक्ती कशातच नाही. मात्र ते विसरण्याची शक्ती दोन गोष्टींमध्ये आहे. एक म्हणजे तत्त्वज्ञान तर दुसरा विनोद. तत्त्वज्ञान तर प्रत्येकाला समजू शकत नाही. पण विनोदाचे तसे नाही. विनोद ही मानवाची नैसर्गिक गरज असून त्यासाठी कसलीही प्रगल्भता लागत नाही. तत्वज्ञान समजण्याची शक्ती किती लोकांमध्ये आहे, हा प्रश्नच आहे. जगण्याची प्रेरणा विनोदामध्ये आहे. त्याने जीवन सुखी होते. कथाकथन करणा-या व्यक्तीच्या वक्तृत्वात नाट्य व खिळवून ठेवण्याची ताकद पाहिजे. वक्तृत्वाचे गुण देखील त्याच्यामध्ये असणे आवश्यक आहेत.
विनोदी कादंबरी लिहायची होती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2016 3:47 AM