पुणे : शहरात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या शुक्रवारीही कायम आहे. आज दिवसभरात ५ हजार ६३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ तर तपासणी केलेल्या २२ हजार ९६२ जणांपैकी ४ हजार ४६५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १९.४४ टक्के इतकी आहे़ गेल्या काही दिवसात प्रथमच कोरोनाबाधितांची तपासणीच्या तुलनेतील टक्केवारी ही २० टक्क्यांच्या आत आली आहे़
आज दिवसभरात सर्वाधिक म्हणजे ८० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २२ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६३ टक्के इतका आहे़ पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ६ हजार २५६ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत आहे. १ हजार ३२८ रूग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत १९ लाख ९१ हजार ४७६ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी ३ लाख ९१ हजार ४९५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ३ लाख ३४ हजार ७८२ कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५० हजार ३२५ इतकी झाली आहे़