लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : शहर आणि तालुक्यात गेल्या २४ तासांत आढळलेली कोरोनाबाधितांची संख्या दिलासा देणारी आहे. प्रशासनाने गेल्या ४८ तासांत १२०१ तपासण्या केल्या आहेत. यामध्ये केवळ १७ कोरोनाबाधित आढळले. यात शहरातील ८ आणि ग्रामीणच्या ९ रुग्णांचा समावेश आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यानुसार २४ जून रोजी प्रतीक्षेत असलेल्या २४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी बारामतीमधील सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी (दि. २५) एकूण ६५० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ७६ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. इतर तालुक्यातील ४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
गुरुवारी (दि. २४) तालुक्यामध्ये खासगी प्रयोगशाळेत ३३ आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच एकूण ५९४ अँटिजन करण्यात आल्या. त्यापैकी ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या २४ तासांत एकूण १७ जण कोरोनाबाधित आले आहेत. तालुक्यातील आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या २५ हजार ४९५ वर पोहोचली आहे. तर एकूण २४ हजार ५८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बारामतीत सध्या ३७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील व्हेंटिलेटरवर २३ तर ऑक्सिजनवर ५२ रुग्ण उपचार घेत आहेत. बारामतीत आजपर्यंत १ लाख २९ हजार ५१ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. वेगाने लसीकरण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कमी लोकसंख्या असलेल्या गावांचे शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन असल्याचे आरोग्य प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. बारामतीत ठराविक अपवाद वगळता इतर सर्वच व्यवहारांना दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्याची प्रशासनाने परवानगी दिली आहे.
चौकट
बारामतीतील ५ कोविड केअर सेंटर सध्या सुरू आहेत. २१४ रुग्ण उपचार घेत आहेत. सुपे येथील केंद्रात ९, तर मोरगावच्या केंद्रात १२ रुग्ण आहेत. रुग्णसंख्या घटल्यास लवकरच ही दोन्ही कोविड केअर सेंटर बंद केली जाणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खोमणे यांनी सांगितले.
...बारामतीत म्युकरोमायकोसिसचे ३१ रुग्ण
तालुक्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या ३९ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या आठने वाढली आहे. यात बारामती तालुक्यातील ३१ रुग्ण आहेत. तर इतर तालुक्यातील ८ रुग्णांचा समावेश आहेत, असे डॉ.मनोज खोमणे यांनी सांगितले.
———————————————