लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने जिल्ह्याच्या प्राणवायूच्या मागणीत माेठी वाढ झाली होती. अचानक मागणी वाढल्याने प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्यामुळे प्राणवायूच्या मागणीतही घट झाली आहे. सध्या जिल्ह्याला २४९.३ मेट्रिक टन प्राणवायूची मागणी असून, यात ६५ टक्क्यांनी घट झाली आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. मागणीच्या तुलनेत मात्र पुरवठा कमी होत असल्याने संपूर्ण राज्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. पुरवठा सुरळीत करण्यासाठी उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. पुण्यात चाकण येथेच ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प होता. मात्र, या एकट्या प्रकल्पाला पूर्ण जिल्ह्याचा आणि विभागाची मागणी पुरवणे शक्य होत नव्हते. यामुळे परराज्यातून ऑक्सिजन जिल्ह्यात आणण्यात आले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्याला ४०० ते ५०० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजनची मागणी कोरोनाकाळात वाढली होती. दरम्यान, ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णालयांना धावपळ करावी लागली. अनेक रुग्ण प्राणवायूअभावी दगावले. प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून ही मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. एकेकाळी पुणे विभागाला ६११ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन पुरवठा करावा लागत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनाबाधितांची आणि दुसऱ्या लाटेची तीव्रता हळुहळू कमी झाल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही घट झाली आहे. सध्या जिल्ह्याला १२८ टक्के मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. यात २३४.५ ने घट झाली असून, मागणीत उणे ६५ टक्क्यांची घट झाली आहे. जशी रुग्णांची संख्या कमी होईल त्यानुसार या मागणीत आणखी घट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
चौकट
पुणे विभागाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ६११. ७ मेट्रिक टन प्राणवायू लागत होता. मात्र, यात घट झाली आहे. या आठवड्यात विभागाची प्राणवायूची मागणी २४९.३ मेट्रिक टन होती. कोरोनाच्या लाटेच्या उच्चांकाचा विचार केल्यास उणे ३६२. ४ मेट्रिक टनाची घट झाली आहे. विभागाची एकूण मागणीत उणे ५९ टक्क्यांची घट नाेंदवण्यात आली आहे.
चौकट
प्राणवायूचा पुरवठा आणखी वाढणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूसाठी प्रशासनाची झालेली दमछाक पाहता जिल्हा नियोजनाच्या निधीतून १०, तर खासगी कंपन्याच्या सामाजिक दायित्व निधीतून २३ ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यात जिल्हा परिषदेच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात प्रकल्पासाठी पायाभरणी तयार करण्यात येत आहे. तर, कंपन्यांच्या मार्फत प्रकल्पाला लागणारी यंत्रणा दिली जाणार आहे. सध्या ८ प्रकल्प कार्यान्वित झाले असून येत्या महिनाभराच्या अवधित सर्व प्रकल्प कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.