पुणे : पुर्नमूल्यांकनाच्या नियमात बदल करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेत घेतल्याने काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी पुनर्मूल्यांकनामध्ये दहा टक्के गुणात बदल झाले तरच पुढील गुणात बदल केले जात असत. परंतु आता पाच टक्के गुण बदलले तरी गुणात वाढ होणार आहे.विद्या परिषदेची गुरुवारी बैठक झाली. यामध्ये विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून पुर्नमूल्यांकनाबाबत मांडलेल्या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. आता हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेकडे जाणार आहे. पुनर्मूल्याकंनाबरोबरच काही अभ्यासक्रम बंद करणे, विद्यापीठामध्ये नवीन विभाग सुरू करणे आणि पीएच.डी. गाईड यांच्या कालावधीबाबत चर्चा करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार वाणिज्य विद्या शाखेअंतर्गत चालविला जाणारा एमसीए अभ्यासक्रम बंद करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्याचबरोबर हा अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीने चालवावा, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत चालविला जाणारा बीएसस्सी हॉस्पिटॅलिटी हा अभ्यासक्रम विज्ञान विद्याशाखेअंतर्गत सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाला जोडून अभियांत्रिकी विभाग सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘काठावर’च्या विद्यार्थ्यांना दिलासा
By admin | Published: January 22, 2016 1:52 AM