पिंपरी : आर्थिक अडचणीत वाढ झाल्याने महावितरणने ग्राहकांना बिल भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले होते. त्याला प्रतिसाद देत पुणे परिमंडळातील ६८ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी ९९ कोटी ६१ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
वीज बिल थकबाकी वाढल्यास महावीतरणच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली असती. त्यामुळे वीजग्राहकांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांना चालू व थकीत देयके भरण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील ग्राहकांनी मोठ्याप्रमाणावर बिल भरणा सुरू केला आहे.
पुणे परिमंडलात लॉकडाऊनच्या मार्च, एप्रिल व मे तसेच जून महिन्यामध्ये वीजबिलांचा भरणा पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यानंतर जुलैपासून वीजबिलांचा भरणा वाढला असला तरी सद्यस्थितीत पुणे परिमंडलामधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ११ लाख ६५ हजार ग्राहकांकडे ७९४ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून वीजबिलांच्या थकीत रकमेचा भरणा करण्याची विनंती महावितरणकडून करण्यात येत आहे.
थेट संपर्क साधून वीजबिलांचा भरणा करणाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील ६८ हजार ३०० थकबाकीदारांनी ९९ कोटी ६१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये पुणे शहरातील २६ हजार ७२५ ग्राहकांनी ४३ कोटी ६० लाख, पिंपरी व चिंचवड शहरातील १६ हजार ९०० ग्राहकांनी २३ कोटी ९० लाख रूपयांचा भरणा केला आहे. तर, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी व वेल्हे तालुक्यातील २४ हजार ७०० ग्राहकांनी ३२ कोटी १० लाख रुपयांचा भरणा केला आहे.
लॉकडाऊनमधील वीजबिलांबाबत शंका निरसन करण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत जूनपासून ९७ वेबिनार व ११५ मेळावे घेण्यात आले. तर २८६ ठिकाणी ग्राहक मदत कक्ष स्थापन करण्यात आले. यामध्ये सुमारे चार लाख दोन हजार वीजग्राहकांचे शंका निरसन करण्यात आले आहे.