लाेकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळून निघालेल्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. आतापर्यंत बाधित झालेल्या ५७ लाख ६१ हजार रुग्णांपैकी ५४ लाख ३१ हजार रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा एकूण मृत्यूदर १.२८ असून, राज्याचा मृत्यूदर १.६७ टक्के जास्त आहे. राज्याचा प्रवास हळूहळू कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. असे असले तरी नव्या नियमावलीचा विचार केला असता, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यातील मुंबई, पुणे जिल्हा सर्वाधिक बाधित झाला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत जवळपास सर्वच जिल्हे बाधित झाले. काही मोजकी जिल्हे साेडली तर बहुतांश जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण हे वाढलेले होते. आता केवळ १० जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. यात पुणे, सातारा, कोल्हापुर, मुंबई, ठाणे, सांगली, अहमदनगर, नाशिक, नागपूर, सोलापूर या जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात लावण्यात आलेल्या नियमावलींमुळे दैनंदिन कोरोनाबाधितांचा दर कमी झाला आहे. दैनंदिन होणाऱ्या चाचण्यांच्या प्रमाणात रुग्ण कमी झाले आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख ७७ हजार ६५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. अडीच लाखांच्या आसपास रोज दैनंदिन चाचण्या होत आहेत. १ जून रोजी २ लाख २१ हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १४ हजार १२३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. मे महिन्याच्या तुलनेत रोज बाधितांचा आकडा हा कमी झाला आहे.
चौकट
१७ जिल्ह्यांचा बाधितांचा दर राज्याच्या एकूण दरापेक्षा जास्त
राज्याच्या एकूण बाधित दर हा ०.२४ टक्के आहे. मात्र, १७ जिल्ह्यांचा बाधित दर हा राज्याच्या तुलनेत जास्त आहे. यात सिंधुदुर्ग २.२०, कोल्हापूर १.७४, रत्नागिरी १.३६, सातारा १.२९, सांगली ०.९२, बुलडाणा ०.७०, बीड ०.६५, वाशीम ०.६१, उस्मानाबाद ०.५६, अमरावती ०.५५, अहमदनगर ०.५१, सोलापूर ०.५०, पालघर ०.४७, अकोला ०.४६, यवतमाळ ०.४६, रायगड ०.४३, गडचिरोली ०.३६ एवढा रग्णबाधितांचा दर आहे.
चौकट
लसीकरणात देशात राज्य अव्वल
देशात लसीकरणाच्या बाबतीत राज्याचा प्रथम क्रमांक आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी ८२ लाख ५३ हजार ९३५ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ४६ लाख २१ हजार ८५३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण २ कोटी २८ लाख ७२ हजार ७८८ जणांनी लसीकरण केले आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.