पुणेकरांसाठी 'दिलासादायक' बातमी; चारचाकी वाहनांमध्ये आता मास्क वापरण्याची आवश्यकता नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 04:28 PM2021-01-22T16:28:23+5:302021-01-22T16:36:49+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय

'Comfortable' news for Punekars; No need to use a mask in a car anymore | पुणेकरांसाठी 'दिलासादायक' बातमी; चारचाकी वाहनांमध्ये आता मास्क वापरण्याची आवश्यकता नाही

पुणेकरांसाठी 'दिलासादायक' बातमी; चारचाकी वाहनांमध्ये आता मास्क वापरण्याची आवश्यकता नाही

Next
ठळक मुद्देप्रवासी मोटारींमध्ये मात्र वापर अनिवार्य

पुणे : शहरातील कौटुंबिक वापराच्या मोटारींमधून प्रवास करणाऱ्यांना आता मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. पालिकेने हा नियम शिथील केला असून केवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारींमध्येच मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची घटलेली संख्या लक्षात नागरिकांकडून ही मागणी केली जात होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाच्या निदेर्शांनुसार, विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पालिका आणि पोलिसांकडून एकत्रितपणे ही कारवाई केली जात असून आतापर्यंत दहा कोटींपेक्षा अधिक दंड वसुल करण्यात आला आहे. दुचाकी चालक, चारचाकी चालक, तीन चाकी आणि पादचाऱ्यांवर कारवाई होत आहे. या कारवाईला विरोध नसला तरी कारवाईमधून मोटारीला वगळावे अशी मागणी नागरिकांनी केलेली होती. मोटारीच्या काचा बंद असतात, एकाच कुटुंबातील अथवा निकटच्या संपर्कातीलच माणसे एकत्र प्रवास करीत असतात. गाडीच्या काचा बंद असल्याने त्याचा इतरांना काहीही धोका नसतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.

एकीकडे शहरात वडापाव, पाणीपुरी, चाटच्या गाड्यांसह चहाच्या टपऱ्यांवर विनामास्क गर्दी होत आहे. रेस्टॉरंट, हॉटेल आणि बारमध्ये मास्क काढूनच शेकडो नागरिक खात-पित असतात. याठिकाणी मास्क नसलेला चालतो; तर मग बंदिस्त चारचाकीमधून जाणा-या नागरिकांवरच मास्कची कारवाई का केली जात आहे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करु लागले होते. पोलिसांच्या झुंडीच्या झुंडी गाड्या अडवून दंडाची वसुली करीत असल्याने शासनाला तिजोरी भरण्यासाठी नवे  रेव्हेन्यू मॉडेल सापडल्याची टीकाही होऊ लागली होती. कोरोना काळात नागरिकांच्या नोक-या गेल्या आहेत. अनेकांना रोजगार नाहीत. त्यातच वेगवेगळ्या दंडाच्या रकमांमुळे नागरिक मेटाकुटीला आले होते.

पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही मोटारीत मास्क वापरण्याचे बंधन काढून टाकण्याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
====
एकाच कुटुंबातील व्यक्ती जर खासगी मोटारीमधून प्रवास करीत असतील तर त्यांनी मास्क लावणे अनिवार्य नाही. परंतु, प्रवासी वाहतूक करणा-या मोटारी, ओला-उबेरसारख्या मोटारींमधून प्रवास करीत असताना चालकासह सर्वांनी मास्क लावणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठकीमध्ये चर्चा झाली. नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- मुरलीधर मोहोळ, महापौर 

Web Title: 'Comfortable' news for Punekars; No need to use a mask in a car anymore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.