पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी निवडण्यात आलेल्या एजन्सीच्या संस्थापकांबरोबर विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर बुधवारपासून विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीतपणे सुरू झाल्या. एजन्सीचा आणखी एक वरिष्ठ अधिकारी दिल्लीहून पुण्यात आल्यामुळे यापुढील परीक्षांना सुध्दा कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असा विश्वास विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी दिल्ली येथील 'पीपल स्ट्रॉंग टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड' या एजन्सीची ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेसाठी नियुक्ती केली. एजन्सीचे काही कर्मचारी विद्यापीठात वॉर रूम उभारुन परीक्षेचे काम करत आहेत. परंतु, १२ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या परीक्षेत अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.मात्र,या अडचणी एजन्सीच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयापर्यंत पोहोचत नव्हत्या. त्यामुळे परीक्षेतील त्रुटी कायम होत्या. अखेर विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी लंडनहून कामकाज पाहणाऱ्या कंपनीच्या संस्थापकांबरोबर याबाबत चर्चा केली.एजन्सीने त्यानंतर परीक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व्हरमधील अडचणी दूर केल्या, अनावश्यक कचरा काढून टाकला. ऑप्टिमायग्रेशन टेक्निकचा वापर करून विशिष्ट काळामध्ये सर्व्हर चांगल्या पद्धतीने काम करू शकेल अशी व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे बुधवारी काही अपवाद वगळता सर्व परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या.
कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना मधील समन्वयाच्या अभावामुळे परीक्षेमधील अडचणी दूर होत नव्हत्या. त्यामुळे आता कंपनीचा एक वरिष्ठ अधिकारी परीक्षा संपेपर्यंत विद्यापीठात बसून राहणार आहे. बुधवारी हा अधिकारी विद्यापीठात उपस्थित होता. त्यामुळे परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या, असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.---------------परीक्षेसाठी निवडलेल्या एजन्सीने 'डेटा बॅलन्सिंग' , ऑप्टिमायजेशन टेक्निकचा वापर करून उपलब्ध रिसोर्सेसच्या मदतीने अधिक चांगल्या पद्धतीने परीक्षा घेणे शक्य होईल, अशी सिस्टीम उभी केली. विद्यापीठाने सुद्धा विद्यार्थ्यांना सकाळी १० ते १२ या कालावधित केव्हाही लॉग-इन करण्याची की मुभा दिली. त्यामुळे बुधवारी परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या.- डॉ.महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ