पुणे : राज्य शासन आणि महापालिकेकडून कडक निर्बंध लावून १५ दिवस उलटून गेले आहेत. या काळात आरटी-पीसीआर चाचण्या करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी होत असून पॉझिटिव्हीटी रेटही कमी झाला आहे. निर्बंधांचा परिणाम काही प्रमाणात दिसत असला, तरी त्याचा वेग मात्र कमी आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत या निर्बंधांचे ''रिझल्ट'' दिसतील, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रुग्णवाढ या निर्बंधांचा खरोखरीच उपयोग होतो का, याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. कारण, नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. रस्त्यावर एवढ्या कडक निर्बंधांमध्येही गर्दी होत आहे. वाहनचालक रस्त्यावर राजरोसपणे फिरत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पोलिसांकडूनही नागरिकांना फारसे टोकले जात नाही. पहिल्या लाटेत पोलिसांनी कडक करवाईववर भर दिला होता. मात्र, यावेळी पोलिसांकडून ढिल दिली जात असल्याचे चित्र दिसत आहे.
दररोजची रुग्णसंख्या कमी होत नसल्याने संचारबंदीचा खरोखरीच उपयोग झालाय का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. प्रशासनाकडून मात्र पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून रुग्णांचा आकडा स्थिर असून आणखी काही दिवस हा आकडा स्थिर राहिल्यास तो कमी होत जाईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
-----
कडक निर्बंधांचा परिणाम दिसू लागला आहे. दोन आठवड्यांपूर्वी आरटी-पीसीआर चाचणीला येणाऱ्यांमधून ५०-५५ टक्के नागरिक पॉझिटिव्ह येत होते. परंतु, या आठवड्यात पॉझिटिव्हीटीचे हे प्रमाण ३०-३५ टक्क्यांवर आले आहे. पूर्ण लॉकडाऊन हा पर्याय नसला तरी कडक निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. ३० एप्रिलपर्यंत वेळ द्यायला हवा. यासोबतच तिसऱ्या लाटेची शासन-प्रशासनाकडून तयारी केली जाणे आवश्यक आहे. दुसऱ्या लाटेआधी मिळालेल्या अवधीमध्ये वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे आवश्यक होते.
- डॉ. संजय ललवाणी, भारती हॉस्पिटल
-----
संचाराबंदी असली तरी या निर्बंधांचे लोकांकडून पालन होत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. लोकांनी नियमांचे पालन केले तर रुग्णसंख्या आणखी कमी होऊ शकते. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ देणेही आवश्यक आहे. त्याशिवाय या निर्बंधांचे योग्य परिणाम दिसणार नाहीत.
- डॉ. बाळासाहेब देशमुख, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे
-----
कडक निर्बंध लावल्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या काही दिवसात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. रुग्णसंख्या सुद्धा मागील तीन चार दिवसांपासून स्थिर आहे. अशीच स्थिती राहिली तर रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाहीत. पुण्याला कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका
-----