पुणे : पुलंच्या विनोदाचे किस्से सांगून हास्यरसात चिंब भिजविणारी ‘मिरासदारी’ शैली आणि एकदा आमच्या पुरंदरवाड्यामध्ये आल्यानंतर तो जिना पाहून ‘हा जिना म्हणजे एका जख्ख म्हातारीने कथकची पोज घ्यावी,’ असा पुलंनी केलेला विनोद कथन करणारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भारदस्त वाणीतील ‘खुमासदार’ शैली अशा दोन दिग्गजांच्या आठवणीतील साक्षीदार ठरलेल्या ‘पुलं’च्या एकसे बढकर विनोदी षटकारांमधून रसिकांची सायंकाळ ‘पुलकित’ झाली. पुलंची गाणी, वाणी आणि लेखणी आजही कशी ताजी आहे, याचा प्रत्यय आलेल्या या दिग्ग्जांनी पुलंच्या स्मृतीचा पट उलगडला.निमित्त होते, आशय सांस्कृतिक व स्क्वेअर वन इव्हेंट्स अॅण्ड मीडिया आयोजित पुलोत्सवाचे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सागर पवार यांनी रेखाटलेल्या पुलंच्या व्यंगचित्राचे प्रकाशन करून पुलोत्सवाचे गुरुवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी द. मा. मिरासदार यांना जीवनगौरव सन्मान आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला तरुणाई सन्मान पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, अतुल शहा, वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार उपस्थित होते.निवेदक सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून बहुगुणी पुलं रसिकांसमोर उलगडत गेले. एकदा एका ऐतिहासिक भिंतीवर कोणीतरी नाव कोरून ठेवले होते. त्याचा पुलंना विलक्षण राग आला आणि ते नाव खोडून टाकण्यासाठी ‘रात्री ये आणि त्याच्याखाली हे गृहस्थ कालच वारले,’ असे लिही. मिरासदारांनीही रसिकांवर हास्याचे फवारे उडवले. विनोदी, मिश्किल अशा पुलंना सामाजिक भानही प्रचंड होता, हे सांगताना द. मा मिरासदार यांनी त्याकाळी गरजूंना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी काम करणाऱ्या परूळेकर बाईंसाठी पुलंनी ४० हजार रुपयांचा निधी ४० प्रयोग करून कसा उपलब्ध करून दिला, हे ऐकविले. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.
विनोदी किश्शांनी रसिक ‘पुलकित’
By admin | Published: November 11, 2016 1:55 AM