पुणे : जिल्ह्यामधे मतदारांची संख्या ७३ लाख ६३ हजार ८१२ असून, त्यापैकी ३१ लाख ४० हजार ८१७ (४२ टक्के) मतदार ३९ वर्षाखालील आहेत. तसेच, २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आगामी निवडणुकीत मतदारांची संख्या ४ लाख ३६ हजार ६१ ने वाढली आहे. जिल्हा निवडणूक शाखाने वयोगटानुसार दिलेल्या आकडेवारीवरुन मतदारांचा युवा चेहरा समोर आला आहे. जिल्हा निवडणूक शाखाने ३१ जानेवारी २०१९ अखेरीस जिल्ह्यात ३८ लाख ५१ हजार ४४५ पुरुष आणि ३५ लाख १२ हजार २२८ महिला मतदार आहेत. तर, भिन्न लिंगी मतदारांची संख्या १३९ इतकी आहे. जिल्ह्यात पर्वती मतदार संघात सर्वाधिक ३८ भिन्न लिंगीय मतदार असून, पाठोपाठ चिंचवडमध्ये २७ इतकी संख्या आहे. जिल्ह्यात १८ ते १९ वर्षांखालील ५४ हजार ११५ आणि २० ते २९ वयोगटातील १२ लाख ७ हजार ९५५ मतदार आहेत. तर त्यावरील मतदारांची संख्या ४२ लाख २२ हजार ९९५ इतकी आहे. त्यातही वयाची ८० वर्षे पूर्ण केलेले तब्बल २ लाख ३९ हजार ५६७ मतदार आहेत. जिल्ह्यात ३० ते ३९ या वयोगटातील सर्वाधिक १८ लाख ७८ हजार ७४७ मतदार असून, पाठोपाठ ४० ते ४९ या वयोगटात १६ लाख ६८ हजार ८३७ मतदार येतात. तसेच, ६० ते ५९ वयोगटात ७ लाख ४१ हजार ८२८ आणि ७० ते ७९ वयोगटात ४ लाख २५ हजार ९१० मतदार येतात. ---------------------खडकवासला मतदार संघ तरुणजिल्ह्यात खडकवासला मतदार संघात एकूण ४ लाख ६२ हजार ५७६ मतदार असून, त्यात २९ वर्षांखालील मतदारांची संख्या तब्बल ७५ हजार ७२७ इतकी आहे. त्यात २,५७७ मतदार १८ ते १९ आणि ७३,१४७ मतदार २९ वर्षे वयोगटाखालील आहेत. भोसरी मतदारसंघात २९ वयोगटाखालील ७३,२९९ आणि १८ वयोगटाखालील १,७९२ मतदार आहेत. तर, २९ वर्षांखालील एकूण मतदारांची संख्या ७५,०९१ इतकी भरते. -----------------------जिल्ह्यातील ५४ हजार युवा करणार पहिल्यांदाच मतदानजिल्ह्यातील १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या ५४,११५ इतकी आहे. त्यात ३३,२२३ पुरुष आणि २०,८९० स्त्री मतदार आहेत. त्यातही भोर तालुक्यात सर्वाधिक ४,४११ मतदार १८ ते १९ वयोगटातील आहेत. त्यात पुरुष २,७०६ आणि १,७०५ स्त्री मतदार आहेत.
येत्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये ‘युवा’वर्ग ठरणार ‘हुकमी एक्का’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 12:07 PM
आगामी निवडणुकीत तरुण वर्ग नेमका कुणाच्या पाठीवर ठेवतो पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
ठळक मुद्देमतदारांत ४२ टक्के युवा : पाच वर्षांत मतदार संख्या वाढली सव्वाचार लाखांनी