सागर शिंदे
इंदापूर : शेतीतील जुन्या चाकोरीबद्ध चालीरीतींना फाटा देत, अत्यंत कमी पाणी, कमी कष्ट, कमी वेळ व इतर पिकांपेक्षा अधिकचा नफा शेतकऱ्यांना मिळवून देणारी जिरेनियम शेती, इंदापूर शहरालगत युवा शेतकरी अंगद मुकुंद शहा यांनी तब्बल आठ एकर जिरेनियम ही सुगंधी औषधी वनस्पती शेती फुलवली आहे. हा युवक सिंगापूरला उच्च शिक्षण घेऊन इंदापूरला येऊन जिरेनियमची शेती करत आहे.
इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध कापड व्यावसायिक गोकुळदास (भाई) शहा यांचे नातू व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, तसेच इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांचा मुलगा अंगद याने परदेशात सिंगापूर येथे एमबीए शिक्षण घेतले आहे. त्याने इंदापूर शहरालगत आठ एकर जिरेनियम पिकाची शेती केली आहे. अंगद शहा म्हणाले की, पाणी कमी असताना देखील, शेतीमध्ये आपण बरेच काही करू शकतो. याची जाणीव झाल्यावरच मी शेतीकडे वळालो. शेतात जिरेनियम हे पीक घेतले असून ही वनस्पती सुगंधी व औषधी आहे. शेतकऱ्यांना ह्या पिकातून तीन ते चार वर्षे सलग उत्पन्न घेता येते. एक एकर जिरेनियम शेती करण्यासाठी किमान नऊ तेे दहा हजार रोपे लागतात. हे पीक वर्षामध्ये तीन वेळा कापणीला येते, त्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने खेळतेेे भांडवल निर्माण होते. या पिकासाठी कोणतीही फवारणी आवश्यक नाही. कोणतेही महागडेे खत आवश्यक नाही. इतर शेतातील पिकांच्या तुलनेत ८० टक्केे खर्च कमी येतो.
या पिकापासूून ऑईलची निर्मिती करण्यात येते. ऑईल निर्मिती करून सुका कचरा खाली राहतो, यापासून शेतातील बागा फुलवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे सेंद्रिय खत निर्माण होते. जिरेनियम पिकातून निघालेले ऑईल आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजार पेठेत व राज्यात १२ ते २० हजार रुपये लिटरने विकले जाते. साधारणपणे एका एकरात पाच ते सहा लाख रुपये छोटा शेतकरी कमाई करू शकतो.
जिरेनियम हे सुगंधी औषधी वनस्पती असल्यामुळे याला प्रचंड मागणी आहे. हे पीक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कमी पाण्यावर देखील अत्यंत चांगले करता येते. हमखास उत्पन्न या शेतीतून कमावता येते. हायडेन परफ्यूम व कॉस्मेटिकसाठी याचा वापर केला जातो. परफ्युममध्ये जे नैसर्गिक तत्त्व लागतात, ती या जिरेनियममधूनच मिळते. म्हणून जिरेनियमशिवाय पर्याय नाही. या वनस्पतीची भारताला दर वर्षी ४०० टनाच्या आसपास गरज असते. त्या प्रमाणात उत्पादन होत नाही, ही शेती ग्रामीण भागातील व कमी पाणी असणाऱ्या पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी असल्याचे मत युवा शेतकरी अंगद शहा यांनी व्यक्त केले. शहरातील नाभिक बांधवांना मोफत गुलाब जल
युवा शेतकरी अंगद शहा यांनी आपल्या शेतातच जिरेनियम ऑईलच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. त्यामधून बायप्रॉडक्ट निघणाऱ्या गुलाब जल हे, त्वचेला तजेलदारपणा येण्यासाठी अंत्यत गुणकारी आहे. शेतात निर्मिती झालेले गुलाब जल, इंदापूर शहरातील नाभिक बांधवांना, नगरसेवक भरत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक जाणिवेतून मोफत पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या युवा शेतकऱ्याने तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
इंदापूर शहरालगत जिरेनियमची शेती फुलवणारे युवा शेतकरी अंगद शहा शेती पीक दाखवताना.