चंद्रकांत पाटील म्हणाले, निवडणुकीत ५० विरुद्ध ५ वर्षांचा कारभार हाच मुद्दा राहणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 11:01 AM2022-02-25T11:01:24+5:302022-02-25T11:09:24+5:30
भाजपने सत्तेत आल्यावर केलेली कामे जनतेसमोर मांडली जाणार ...
पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसची ५० वर्षांतील कामे व गेल्या ५ वर्षात भाजपने सत्तेत आल्यावर केलेली कामे जनतेसमोर मांडली जाणार असून, हाच या निवडणुकीचा मुख्य मुद्दा राहणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी सांगितले.
तांत्रिक कारणांमुळे जायका प्रकल्पाला विलंब झाला आहे. अद्याप नदीकाठ सुधार, जायका प्रकल्प सुरू झाले नसले तरी, पुढील काळात आम्ही कोणत्या दिशेने जाणार आहोत, हे या प्रकल्पाच्या मान्यतेतून स्पष्ट होत आहे, असंही पाटील म्हणाले.
शहरातील गुंठेवारी हा अतिशय चिंतेचा विषय झाला असून, राज्य सरकारने नियमित करताना चुकीचे धोरण अवलंबिले असल्याने, अनेकांना खरेदी केलेल्या घरांचा लाभ घेता येत नाही़ महाविकास आघाडी सरकारने गुंठेवारीचे नियमितीकरण करण्यासाठी जे दंडात्मक शुल्क आकारले आहे, ते अतिशय अवाजवी असून, ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून यावर आवाज उठवून, सरकारचे लक्ष वेधून घेणार असल्याचेही पाटील म्हणाले.