लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता केंद्रिय पथकापासून शासकीय स्तरावरील विविध आरोग्य यंत्रणांनी वर्तविली आहे. त्याअनुषंगाने पालिकेने रुग्णवाढ अपेक्षित धरुन नियोजन केले आहे. १ डिसेंबर ते १० डिसेंबर हा महत्वाचा काळ असून या दिवसांमधील रुग्णवाढीच्या ‘ट्रेंड’वरुन दुसरी लाट आली किंवा नाही याबाबतचे चित्र स्पष्ट होईल असे अधिका-यांनी सांगितले.
दिवाळीपुर्वी शासनाने ब-याचअंशी लॉकडाऊनमध्ये शिथीलता देत व्यापारी वर्गासह नागरिकांना दिलासा दिला होता. हॉटेल आणि दुकानांच्या वेळाही वाढवून दिल्या होत्या. नागरिकांनी दिवाळीच्या पार्श्वभुमीवर खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. या गर्दीची परिणीती कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामध्ये होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. याच कालावधीत पुण्यामध्ये येऊन गेलेल्या केंद्रिय पथकाने दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता.
नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्ण कमी झालेले असले तरी गेल्या आठवड्यात हा आकडा कमी अधिक होत गेला आहे. दिवाळी झाल्यानंतर दोन आठवड्यात हा आकडा वाढेल असा अंदाज होता. गेल्या दोन आठवड्यात रुग्ण वाढत असले तरी अद्याप लक्षणिय वाढ झालेली नाही. भारतातील ज्या शहरांमधील विमान सेवा बंद आहे अशा शहरातून पुण्यामध्ये नागरिक येत आहेत. यासोबतच अन्य राज्यांमधूनही नागरिक प्रवास करीत आहेत. त्यामुळे आणखी रुग्ण वाढतील असाही आखाडा बांधला जात आहे.
शहरातील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असून प्रशासन दोन हजार रुग्णांपर्यंतची परिस्थिती हाताळण्यास तयार आहे. शहरातील रुग्णवाढीचा नेमका ‘ट्रेंड’ लक्षात येण्यास चालू आठवडा महत्वपूर्ण ठरणार असून त्यानंतरच दुस-या लाटेबाबत स्पष्टपणे सांगता येईल असे पालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.