पुणे : महापालिकेच्या नियोजित शिवसृष्टी प्रकल्पावर आज मुख्य सभेत पुन्हा एकदा जोरदार चर्चा झाली. मेट्रो स्टेशन की शिवसृष्टी, याबाबत येत्या आठ दिवसांत सर्व गटनेत्यांची बैठक आयोजित करून, त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त कुणाल कुमार यांनी सभागृहाला दिले.सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधिस्थळाजवळ पालिकेच्या वतीने स्वराज्यनिष्ठा शिल्प उभे करण्यात येत आहे. या कामासाठी शिवसृष्टीच्या अंदाजपत्रकातील २ कोटी ५० लाख रुपये वर्ग करून, मागण्यांचा विषय मुख्य सभेत होता. तो पुकारण्यात आल्यानंतर, लगेचच पृथ्वीराज सुतार व दीपक मानकर यांनी शिवसृष्टीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसृष्टीच्या नियोजित जागेवर मेट्रो रेल्वेचे स्टेशन येत असल्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे. एकाच जागेवर हे दोन्ही प्रकल्प होणे अशक्य असल्याचे दिल्ली मेट्रो प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसृष्टीला पर्यायी जागा सुचविण्यात आली असली, तरी स्थानिक नगरसेवकांचा आग्रह आहे त्याच जागेवर शिवसृष्टी व्हावी, असा आहे. बैठक घेऊ, चर्चा करू असे आयुक्तांकडून सांगण्यात येते; मात्र होत काहीच नाही. आता तर अंदाजपत्रकही पळविले जात आहे, याचा निर्णय होणार की नाही, असे त्यांनी विचारले. सभागृह नेते बंडू केमसे यांनीही आयुक्तांनी यावर बैठक बोलवावी, अशी मागणी केली. त्यामुळे आयुक्तांनी येत्या आठ दिवसांत या विषयावर सर्व गटनेते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ, असे सभागृहाला सांगितले. (प्रतिनिधी)
शिवसृष्टीसाठी येत्या आठवड्यात बैठक
By admin | Published: December 19, 2015 3:10 AM