पुणे : रेल्वेगाड्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी असो अथवा अतिरेक्यांचा रेल्वे स्थानकावर हल्ला असो, अशा सर्व प्रकारच्या कृत्यांचा मुकाबला करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना कमांडो प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्याची जबाबदारी फोर्स वनकडे सोपविण्यात आली आहे़ दौंड येथे आझाद हिंद रेल्वेतील महिला प्रवाशांना जखमी करून त्यांना लुटण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती़ त्यामुळे रेल्वेगाड्यांमधील सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़ याबाबत पुणे विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त डी़ विकास यांनी माहिती दिली़ ते म्हणाले, की रेल्वेस्थानक व गाड्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे दूरध्वनी गेल्या काही दिवसांत अनेकदा आले होते़ त्याबरोबर अतिरेकीही रेल्वेला लक्ष्य बनविण्याची शक्यता व्यक्त केली जाते़ अशा वेळी त्याचा मुकाबला करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलातील जवानांना कमांडो प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे़ त्यातील पहिली ५० जणांची तुकडी फोर्स वनमध्ये दाखल झाली आहे़ प्रशिक्षणानंतर या जवानांचे एक एक गट करून त्यांना विविध रेल्वे स्थानकांवर तैनात करण्यात येणार आहे़ याशिवाय रेल्वेस्थानकावर डॉग स्क्वॉड, क्युआरटी टीम कायम अॅलर्ट ठेवण्यात आली आहे़ रेल्वेगाड्यांमध्ये सुरक्षा पुरविणे मनुष्यबळाअभावी अशक्य आहे़ रात्रीच्या जवळपास १८ गाड्यांमध्ये सुरक्षा पुरविली जाते़ (प्रतिनिधी)
आरपीएफ जवानांना कमांडो प्रशिक्षण
By admin | Published: March 04, 2016 12:17 AM