काटेवाडी (पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी मार्गात अडथळा ठरणारी काटेवाडी (ता. बारामती) येथील मुलाणी कुटुंबीयांची दुमजली इमारत अखेर बुधवारपासून (दि. २९) मागे सरकविण्याची सुरुवात झाली आहे. इमारत मागे सरकविण्याचा प्रयोग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. सध्या ही इमारत प्रतितास एक फूट याप्रमाणे मागे घेतली जात आहे.
या कुटुंबाने प्रतिकूल परिस्थितीत गेल्या दहा वर्षांपूर्वी आशियाना मंजिल कॉम्प्लेक्स दुमजली वास्तू उभा केली; मात्र पालखी मार्गात येणारी इमारत पाडायला कुटुंबाचे मन धजावत नव्हते. चारच वर्षांपूर्वी हसन व अकबर मुलाणी यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांचे या इमारतीत वास्तव्य होते. त्यांची आठवण म्हणूनही इमारत जतन करण्याची त्यांच्या आईची इच्छा होती. त्या इच्छेचा मान राखण्यासाठी या दोन भावांनी इमारत मागे घेण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियावर इमारत उचलून मागे घेण्याचा प्रयोग त्यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी याच पद्धतीने इमारत मागे घेण्यासाठी हरियाणा पानिपत येथील एका कंपनीबरोबर संपर्क साधला. त्यानंतर यावर काम सुरू करण्यात आले. सध्या इमारत मागे घेण्याचे प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे.