पुणे : गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेला मराठी व्यावसायिक रंगभूमीचा पडदा लवकरच पुण्यात उघडणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट्’ या नाटकाच्या प्रयोगाने १२ डिसेंबर रोजी नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे.
‘एका लग्नाची पुढची गोष्ट्’ या नाटकाच्या प्रयोगाने व्यावसायिक रंगभूमीचा श्रीगणेशा होणार आहे. १२ आणि १३ डिसेंबर रोजी पुण्यात या नाटकाचे तीन प्रयोग होत आहेत. हे प्रयोग पन्नास टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत तसेच सरकारने आखून दिलेले सर्व नियम पाळून सादर केले जातील. करोना काळात नाटक कसे सादर करावे, यादृष्टीने सराव सुरू आहे. ठाणे, कल्याण या महापालिकांनी नाट्यगृहाचे ७५ टक्के शुल्क कमी केले आहे. पुण्यातील नाट्यगृहांचे शुल्क कमी करावे, अशी विनंती महापौर मुरलीधर मोहोळ यांना केली आहे, असे अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांनी सांगितले.
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’नाटकाचा शेवटचा प्रयोग १० मार्च रोजी झाला. १४ मार्चपासून थिएटर आणि नाट्यगृहे बंद झाली. १४ मार्च रोजीचा रद्द झालेला प्रयोग आता १२ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. १३ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर आणि प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे नाटकाचे प्रयोग होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नाट्यगृहांसाठी मार्च २०२१ पर्यंतचे बुकिंग सुरू झाले आहे,'''''''' असे पालिकेचे रंगमंदिर व्यवस्थापक सुनील मते यांनी सांगितले.