पुणे : बँकेची सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण रस्त्यावरील दोन झाडे तोडण्यास परवानगी मागण्यात आली असून, पालिका आयुक्तांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे. बँकेच्या इमारतीवरील जाहिरात फलकाला या झाडांचा अडथळा होत असल्याने घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून ही झाडे तोडण्यासाठी बँकेच्या सुरक्षेची पळवाट शोधण्यात आल्याचा आरोप प्राधिकरणाच्या सदस्यांनी केला आहे.
डेक्कनच्या खंडोजीबाबा चौकामध्ये सेंट्रल बँकेची शाखा आहे. या बँकेच्या इमारतीवर दोन जाहिरात फलक आहेत. या फलकांना झाडांचा अडथळा होत आहे. त्यामुळे झाडांमुळे बँकेची सुरक्षा धोक्यात आहे असे खोटे कारण देऊन हा प्रस्ताव दाखल केला गेल्याचा आरोप वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य मनोज पाचपुते यांनी केला आहे.
तत्कालीन वृक्ष अधिकारी व तज्ज्ञ समिती यांनी कोणतीही पाहणी न करता सही करुन हा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविला. २५ वृक्षांच्या आतील हा प्रस्ताव असल्याने त्याला वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी लागत नाही. त्यामुळे हा प्रस्ताव थेट आयुक्तांकडे दाखल करण्यात आला. आयुक्तांनी देखील कोणतीही शहानिशा न करता प्रस्ताव मंजुर केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या प्रस्तावाला परवानगी देऊ नये असे पत्र घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त व वृक्ष अधिकारी यांना देण्यात आले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करीत वृक्ष तोडण्यास परवानगी नाकारली होती. परंतु, कालांतराने त्यांची बदली झाली. नव्याने नेमणूक झालेल्या सहाय्यक आयुक्तांनी हि परवानगी देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरु केला आहे. त्यामुळे ही झाडे तोडण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.