संजय माने - पिंपरीकर्तृत्वाचा ठसा उमटविण्याच्या दिशेने प्रत्येक पाऊल टाकणाऱ्या तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी प्रशासनावर वचक निर्माण केलाच, शिवाय न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून अवैध बांधकामे नियंत्रित ठेवण्याचे काम केले. याउलट परिस्थिती त्यांच्या जागी एक वर्षापूर्वी रुजू झालेल्या आयुक्त राजीव जाधव यांच्या काळात निर्माण झाली. प्रशासनावरील पकड ढिली झाली. शिवाय, अर्धवट अवस्थेत राहिलेली बांधकामे पूर्णही झाली. दोन आयुक्तांच्या वर्षभराच्या कारकिर्दीचा तुलनात्मक आढावा घेतल्यास ही परिस्थिती दिसून येते.परदेशी यांच्या काळात प्रशासनावर वचकजाधव यांची प्रशासनावरील पकड ढिलीपरदेशी यांचे अवैध बांधकामांवर नियंत्रणजाधव यांच्या काळात अवैध बांधकामे पूर्ण४शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी महापालिकेने स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमावा, असा उच्च न्यायालयाने आदेश दिला असल्याने पदनिर्मितीस शासनमंजुरी मिळताच, महापालिकेने भरती प्रक्रिया हाती घेतली आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत दिरंगाई होते, अशी सबब पुढे करणाऱ्या महापालिकेस न्यायालयाने पदनिर्मिती करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार १५५ पदांची निर्मिती करण्याचे निश्चित करून महापालिकेने पदनिर्मितीस शासनाची मंजुरी मिळवली.४या पदनिर्मितीला मराठा, मुस्लीम आरक्षणामुळे अडचण निर्माण झाली होती, त्यावर महापालिका प्रशासनाने तोडगा काढून आरक्षणाच्या २१ टक्के जागा वगळून उर्वरित जागांसाठी अर्ज मागविले आहेत. त्यामुळे आता १५५ पदांपैकी १३५ पदांची भरती प्रकिया होणार आहे. ४महापालिकेने कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहायक आणि सर्व्हेअर अशा तीन पदांकरिता आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. त्यामध्ये कनिष्ठ अभियंत्याची ६२ पदे भरावयाची असून, त्यांपैकी ५० पदे भरली जाणार आहे. अभियांत्रिकी सहायक ही १०५ पदे भरावयाची असून, सध्या ८३ पदे भरण्यात येणार आहेत. सोबत सर्व्हेअरच्या दोन पदांसाठी अर्ज मागविले आहेत.४अनधिकृत बांधकामांवर कारवाई, नियंत्रण , बांधकाम परवाना देणे यासाठी हा विभाग काम पाहणार आहे. कारवाई थंडावली असली, तरी प्रशासनाने आता भरती प्रकियेला महत्व दिले आहे. महापालिका आयुक्तपदी २०१२ला रुजू झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त परदेशी यांनी महापालिका प्रशासनातच नव्हे, शहरात कायापालट घडवून आणला. न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून त्यांनी प्रभावीपणे अनधिकृत बांधकामांविरुद्धची मोहीम राबवली. त्यांच्या काळात ५५० अवैध बांधकामे जमीनदोस्त झाली. पाडापाडीसाठी आलेले आयुक्त, अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्याचा काहींनी प्रयत्न केला. जिवे मारण्याच्या धमक्या आल्या, तरी न डगमगता ते काम करीत राहिले. अवैध बांधकामे नियमितीकरणासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याने सामान्य जनतेच्या बांधकामांना अभय मिळेल. ही बांधकामे पाडण्याची घाई नको म्हणून त्यांनी सुरुवातीला व्यावसायिक, नदीपात्रातील, आरक्षणातील बांधकामे पाडली जातील, त्यानंतर निवासी बांधकामे, असे कारवाईचे टप्पे निश्चित केले. वर्षानुवर्षे एकाच जागी असलेल्या १२०० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. कामात कुचराई करणाऱ्या २७ जणांचे निलंबन, ४० जणांची खातेनिहाय चौकशी सुरू केली. चार जणांना सेवेतून बडतर्फ केले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. अधिकाऱ्यांना गणवेश वापरणे सक्तीचे केले. गतिमान, पारदर्शी कारभारासाठी दहा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. हे करीत असताना उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी ‘आॅफिसर्स आॅफ द वीक’ उपक्रम सुरू केला. वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारावा, याकरिता वायसीएम रुग्णालयाकडे लक्ष दिले. शासनाकडून तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठी पाठपुरावा केला. वायसीएमला जोडून शासकीय वैद्यकीय सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न केले. लोकाभिमुख प्रशासनासाठी सारथी हेल्पलाईन सुविधा सुरू केली. कर्तव्यदक्ष अधिकारी अशा कार्यशैलीचा ठसा त्यांनी उमटविला. खूप काही सुधारणा करायच्या होत्या, परंतु कालावधी कमी मिळाला, अशी त्यांच्या मनात खंत कायम राहिली. राजकीय स्तरावर श्रीकर परदेशी यांच्या बदलीचे जोरदार प्रयत्न झाले. अखेर बदली झाली. ११ फेब्रुवारी २०१३ला राजीव जाधव परदेशी यांच्या जागी रुजू झाले. रुजू झाल्यांनतर परदेशी यांनी जे काही चांगले उपक्रम राबविले, ते पुढे तसेच सुरू ठेवून आणखी नवीन काय करता येईल, ते करण्याचा प्रयत्न राहील,अशी भूमिका जाधव यांनी व्यक्त केली होती. परंतु, परदेशी यांच्या बदलीनंतर अल्पावधीतच प्रशासनाची शिस्त बिघडली. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार पुन्हा सुरू झाला. महापालिका सभा, स्थायी समिती सभा या वेळी गणवेशात दिसून येणारे अधिकारी रंगीबेरंगी पोशाखात कार्यालयात येऊ लागले. कर्मचारी बेताल वागू लागले. ज्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत, ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, त्यांच्यापैकी अनेक जण पुन्हा कार्यालयात येऊ लागले. ‘सारथी’वर नागरिक तक्रारी नोंदवत होते. त्याची दखल घेतली जात होती. आता केवळ नावापुरती सारथी हेल्पलाईन सुरू आहे. सारथी पुस्तिकेची हिंदी आवृत्ती आयुक्त राजीव जाधव यांनी पुढाकार घेऊन काढली आहे. आठवड्याचे मानकरी (आॅफिसर्स आॅफ दि वीक) या परदेशी यांच्या काळात सुरू झालेल्या उपक्रमात खंड पडू लागला आहे. अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका बंद झाल्या.आयुक्त जाधव यांच्या काळात अवैध बांधकामांवरील कारवाई सुरू आहे, परंतु कुठे तरी, कधी तरी अशा पद्धतीची कारवाई होत आहे. अवैध बांधकामे नियंत्रणाकडे झालेले प्रशासनाचे दुर्लक्ष हीच अवैध बांधकामे पूर्णत्वास नेण्यासाठी उत्तम संधी आहे, हे लक्षात घेऊन नागरिकांनी अनेक बांधकामे पूर्ण केली. फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या नागरिकांनीसुद्धा याच कालावधीत बांधकामे पूर्ण करण्याची घाई केली. शहराच्या विविध भागांना भेटी देण्याचा उपक्रम आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोकळ्या भूखंडांची साफसफाई हे विद्यमान आयुक्त राजीव जाधव यांनी स्वत: पुढाकार घेतलेले महत्त्वाचे उपक्रम आहेत. तसेच, सार्वजनिक वाहतूक सुविधेसंबंधी जनजागृती करण्यासाठी हाती घेतलेला सायकल दिवस अर्थात ‘ट्रिंग ट्रिंग -डे’ होय.