पिंपरी : शहरातील नागरिक आठवड्यातील तीन दिवस आयुक्त शेखर सिंह यांना कामासाठी भेटण्यास येत असतात. मात्र, भेटण्यासाठी दिलेल्या निर्धारित वेळेत आयुक्त सिंह अनुपस्थित असतात. कधी ते अधिकाऱ्यांच्या बैठकीत तर कधी आमदार, खासदारांना ‘रेड कार्पेट’ घालण्यात व्यस्त असतात. त्यामुळे नागरिकांना दालनात तासनतास ताटकळत बसूनही भेट न घेताच परत जावे लागत आहे. ‘ आयुक्त बैठकीत व्यस्त, जनता वेटिंगमुळे त्रस्त ’ असल्याचे चित्र आहे.
आयुक्त शेखर सिंह यांच्या नियुक्तीला १६ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. अनेक नागरिकांना पाणी, कचरा, आरोग्य, रस्ते अशा मूलभूत सुविधांसह विविध प्रश्न, अडीअडचणींसाठी वारंवार आयुक्त दालनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. परंतु, आयुक्त बैठकीला बाहेर गेलेत, अशी कारणे ऐकायला मिळतात.
लोकप्रतिनिधी, अधिकारीही ताटकळतात
सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील तीन दिवस दुपारी तीन ते सहा यावेळेत आयुक्त भेटण्याची वेळ आहे. पण, त्यादिवशी आयुक्त कार्यालयात हजर नसतात. त्यामुळे भेटायला येणाऱ्यांचा हेलपाटा होतो. वेळेचे नियोजन नसल्याचे दिसते. शिवाय वेगवेगळ्या विषयांच्या प्रस्तावांवर स्वाक्षरी घेण्यासाठी आलेले उपायुक्त, सहायक आयुक्त, विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंता हे अधिकारीही वेटिंग रूममध्ये ताटकळत असतात. आयुक्त जागेवर नसल्याने अधिकारी, कर्मचारीही इतरत्र भटकत असतात.
अधिकाऱ्यांना आदेश, पण...
सामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणे, त्यांना भेटीची वेळ न देणे, कामकाजाच्या वेळांचे पालन न करणे अशा तक्रारी महापालिका अधिकाऱ्यांबाबत आल्या आहेत. नागरिकांचे म्हणणे ऐकून तक्रारींची दखल घेण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी चार ते सायंकाळी पाच अशी वेळ सर्व अधिकाऱ्यांनी राखून ठेवावी. राज्य सरकारच्या आदेशाची आठवण करुन देत सर्व विभाग प्रमुखांनी नागरिकांना भेटण्यासाठी वेळ द्यावा, असे आदेश देणारे आयुक्त शेखर सिंह स्वत:च नागरिकांना भेटत नसल्याच्या तक्रारी आहेत.