पुणे : महापालिकेने मागील तीन दिवसांत अमूक अमूक खड्डे बुजविले, त्यासाठी तीन पाळीमध्ये कामगार काम करत होते. यासाठी ५० टन खडी, इमलशन ५० ड्रम वापरले. कोल्डमिक्स बॅग १ हजार २६० वापरल्या, असे सांगत शहरातील ९० टक्के खड्डे बुजविले, असा दावा महापालिका आयुक्तांकडून करण्यात येत आहे. वास्तव मात्र त्याच्या पूर्ण उलटे आहे. हे विदारक चित्र ‘लाेकमत’ने प्रसिद्ध करताच ‘आयुक्त साहेब, जरा नेहमीच्या मार्गावर न जाता शहरात अन्यत्र फिरा, म्हणजे वास्तव कळेल. हीच आम्हा पुणेकरांची अपेक्षा आहे,’ असे आवाहन नागरिक करीत आहेत.
महापालिका प्रशासनाने माध्यमांना माहिती देताना रोज आम्ही किती काम करत आहोत, हे आकड्यांची रोजनिशी मांडून दाखवत आहे. मात्र, जंगली महाराज रस्ता वगळता इतरत्र विदारक स्थिती आहे. तेव्हा प्रशासक तथा आयुक्त म्हणून आपण शहराच्या अन्य भागातील चित्र कधी पाहणार आहात, असा प्रश्न पुणेकर उपस्थित करीत आहेत.
कार्यालयात बसून आलेल्या तुटपुंज्या माहितीवर पथ विभाग खड्डे बुजविल्याचा डंका पिटत आहे; परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता, शहरात येणारा प्रत्येक मार्ग, उपनगरातील रस्ते याकडे कोणी लक्ष देणार? ताे रस्ता आपल्या दप्तरात आहे की नाही, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.
सर्वात प्रथम विरघळणारा पदार्थ?
महापालिकेने एवढे डांबर वापरले, एवढे खड्डे बुजविले. या दाव्यावर आता सोशल मीडियावरही चर्चा होऊ लागली आहे. पावसाळ्यात सर्वात प्रथम विरघळून जाणारा पदार्थ कुठला, मिठ की साखर? याला उत्तर हे दोन्ही नसून महापालिका वापरत असलेले डांबर असे उपहासात्मक बोलले जाऊ लागले आहे. याची किंचित तरी दखल पालिकेने घेतली व रस्ते सुधारणा केली तर प्रशासक राज सार्थकी लागल्याचे समाधान पुणेकरांना मिळेल.
महापालिका अडकली आकडेवारीतबुजविलेल्या खड्यांचा असाही तपशील
१६ जुलै : २९४ (खड्डे), २३ (चेंबर), ४ (पाणी निचरा केले)१७ जुलै : २९७ (खड्डे), १७ (चेंबर), १ (पाणी निचरा केले)१८ जुलै : २५७ (खड्डे), २५ (चेंबर), ६ (पाणी निचरा केले)एकूण : ८४८ (खड्डे), ६५ (चेंबर), ११ (पाणी निचरा केले)