पुणे : कमिशनर अंकल, आमच्या शाळेच्या रस्त्यावर हाेणारी वाहतूक काेंडी केव्हा दूर हाेइल?, महिलांनी सुरक्षेची काय काळजी घ्यावी?, अधिकारी हाेण्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?, तुमच्या जीवनातील आव्हानात्मक प्रसंग काेणता?, पाेलिस आयुक्त म्हणून आपण ताणतणाव कसा हाताळता? यांसह अनेक प्रश्न ‘लाेकमत’ बालपत्रकारांनी पाेलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना विचारले. त्यावर गुप्ता यांनीही मनमाेकळा संवाद साधत दिलखुलासपणे उत्तरे दिली.
लाेकमत कॅम्पस क्लबच्या वतीने पाेलिस आयुक्तालयात ‘लाेकमत बालपत्रकार’ कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. यात सहभाग घेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पाेलिस आयुक्तांशी संवाद साधला. यावेळी ‘लाेकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मिलन दर्डा उपस्थित हाेते.
१) वाहतूक काेंडी कधी सुटणार?
- शाळेच्या रस्त्यावर वाहतूक काेंडी हाेते, ती केव्हा सुटेल अशी विचारणा एका विद्यार्थ्याने केली. त्यावर गुप्ता म्हणाले की, वाहतूक काेंडी हाेऊ नये यासाठी टाऊन प्लानिंग विभागाने काम करणे आवश्यक आहे. मेट्राे विकासासाठी गरजेची आहे. मात्र, एकाच वेळी अनेक रस्त्यांवर काम सुरू असल्याने वाहतूक काेंडी हाेत आहे. ही काेंडी साेडविण्यासाठी आपण मनुष्यबळात वाढ केली आहे, ट्रॅफिक वाॅर्डन नेमले आहेत. चतु:श्रृंगी जंक्शन येथील वाहतूक काेंडी सुरळीत झाली. तसाच प्रयत्न लवकरच इतर भागात केला जाईल आणि हा प्रश्न सुटेल.
२) महिलांच्या सुरक्षिततेबाबत काय उपाययाेजना कराल?
- महिलांच्या सुरक्षिततेबाबत दाेन गाेष्टी महत्त्वाच्या आहेत, एक तुम्ही प्रवासात स्वत: भाेवती सुरक्षिततेचे कवच तयार करा आणि दुसरे पाेलिस प्रशासनाने तुमच्यासाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती करणे. मात्र, घरातच कर्मचारी, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून अत्याचाराच्या घटना माेठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे घरात तसेच परिसरात मुले सुरक्षित राहावीत यासाठी पालकांनी दक्ष राहावे. घरातून बाहेर पडल्यावर तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आम्हा पाेलिसांवर असून, आम्ही गुन्हेगारांचा बंदाेबस्त करू. मुलांना सुरक्षित ठेवणे ही पालकांसह पाेलीस आणि शैक्षणिक संस्थांचीही जबाबदारी आहे.
३) आपण पाेलिस अधिकारी कसे झालात?
- पाेलिस आयुक्त म्हणाले की, खासगी क्षेत्रात चांगली संधी नसल्याने मी यूपीएससी परीक्षा दिली. मला मिळालेल्या गुणांनुसार आयपीएस पाेस्ट मिळाली. मात्र, हीच माझी आवड हाेती असे म्हणणे चुकीचे ठरेल. पद मिळाल्यानंतर मनाची तयारी करीत आवड निर्माण केली. आपण मेहनत घेतली तर माेठ्या पदावर पाेहोचू शकताे. पाेलीस आयुक्त या पदावर काम करण्याचा आनंद मिळताे म्हणून तर मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर कार्यरत असताे. पाेलिस, नागरिकांचे प्रश्न तत्काळ साेडविता येतात या पेक्षा माेठे समाधान दुसरे काेणते नाही.
४) फ्रेंडली सिटी कशी तयार हाेते?
- शहर फ्रेंडली आहे का नाही हे त्या शहरातील नागरिकांच्या वर्तनावरून ठरते. आपले नातेवाईक इतर शहरातून पुण्यात येतात, तेव्हा स्थानिक लाेक त्यांच्याशी कसे वागतात त्यावरून शहर फ्रेंडली आहे का नाही हे स्पष्ट हाेत असतं. नागरिकांचे वर्तन आणि त्यांचा दृष्टिकाेन कसा आहे, यावर शहराबद्दलच्या भावना मनात तयार हाेत असतात.
५) ‘डर’ का हाेना जरूरी है?
- तुमच्यापैकी पाेलिसांना काेण घाबरतं? असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला असता त्यावर काेणीही हाे म्हटले नाही. मात्र, पाेलिसांच्या नावाची भीती हाेती आणि पाेलिसांची भीती असली पाहिजे. चुकीचे काम करणाऱ्यांना तर नक्कीच भीती वाटली पाहिजे. पाेलिस त्यांचे कायदेशीर अधिकार वापरून त्यांच्यावर कारवाई करतील, असे पाेलिस आयुक्त अरविंद गुप्ता म्हणाले.
... तर काेण झाला असता?
- पाेलिस दलात आलाे नसताे तर मी संगणक अभियंता झालाे असताे. माझ्या लहानपणी सगळ्यांनाच पायलट हाेण्याचे आकर्षण हाेते. दुसरे म्हणजे लष्कर आणि पाेलिसांत नाेकरी करावी असे वाटायचे.
६) टाइम मॅनेजमेंट हे माझे बलस्थान!
- दिवसभरातील वेळेचे नियाेजन करणे, त्याचे टप्प्यांत विभाजन करणे हा माझा स्ट्राॅंग पाॅइंट आहे. स्मरणशक्तीच्या बळावर कुठलीही नाेंद न करता मी दिवसभरातील कामे करताे. मी अजूनही डायरी वापरत नाही. यासह सकारात्मकतेने तत्काळ तत्परतेने निर्णय घेत काम करताे.
पाेलिस आयुक्त म्हणाले....
- स्पर्धा परीक्षेची तयारी करीत हाेताे, तेव्हा एक ज्येष्ठ व्यक्ती रस्त्याच्या कडेला टेबल टाकून काही वस्तू विकताना पाहायचाे. त्याच्याकडे काहीच नव्हते. माझ्याकडे तर सगळं आहे. मी एक वर्ष मेहनत केली तर का यश मिळवू शकणार नाही?, असा प्रश्न स्वत:ला करत त्या व्यक्तीकडून प्रेरणा घेतली.- पाेलीस आयुक्त म्हणून कामाचा ताण कमी करण्यासाठी मी दरराेज एक तास याेगासने करताे. ध्यानधारणेला मी गाेळीच समजताे. मनशांतीसाठी याेगासनाची खूप मदत झाली.
या बंदुकीतून एका मिनिटात किती गाेळ्या फायर हाेतात?
- आयुक्तालयात एके-४७, एसएलआर, कार्बाइन या शस्त्राचे प्रदर्शन हाेते. विद्यार्थी हे शस्त्र बारकाइने न्याहाळत हाेते. ते हातात उचलून बघत हाेते. या बंदुकीचे वजन किती आहे?, कशी चालवतात?, एका मिनिटात किती गाेळ्या फायर हाेतात?, यासारखे अनेक प्रश्न कुतुहलापाेटी विचारत माहिती घेतली.