पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम विभागातील सेवाज्येष्ठतेनुसार पात्र अधिकाऱ्यांना डावलून दाेन उपअभियंत्यांवर आयुक्त शेखर सिंह चांगलेच मेहेरबान झाले आहेत. दाेन्ही उपअभियंत्यांकडे कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारी पदभार त्यांनी सोपविला आहे. त्यामुळे पात्र असूनही कार्यकारी अभियंता पदाचा पदभार न मिळालेल्या उपअभियंत्यांनी न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्यासह शहर अभियंता पदावर बढती झाली. त्यानंतर ३१ मेरोजी राणे महापालिका सेवेतून निवृत्त झाले. कार्यकारी अभियंता पदावर सेवाज्येष्ठतेनुसार पात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, महापालिका प्रशासन आणि आयुक्त सिंह यांनी तसे न करता बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपअभियंता सूर्यकांत माेहिते, जलःनिसारण मुख्य कार्यालयाचे उपअभियंता शिवराज वाडकर यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारी पदभार देण्याचा आदेश १० जूनला दिला. वाडकर यांच्याकडे ई-क्षेत्रीय स्थापत्य विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला.
श्रीमंत महापालिकेचा बांधकाम परवानगी विभाग म्हणजे साेन्याची अंडी देणारी कोंबडी असल्यामुळे या विभागात काम करण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये माेठी स्पर्धा असते. बांधकाम परवानगीतून माेठ्या आर्थिक उलाढाली चालतात, असे बोलले जाते. या विभागावर प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय मंडळींचे लक्ष असते. या विभागात मर्जीतील अधिकारी बसविण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे माेहिते आणि वाडकर यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यासाठी राजकीय दबाव आल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.
आयुक्तांना स्वतःच्याच आदेशाचा विसर
आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने उपअभियंता माेहिते व वाडकर यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारी पदभार देण्याचा आदेश १० जूनला जारी केला. आयुक्तांना याबाबत विचारल्यानंतर माहिती घेऊन सांगताे, असे सांगून वेळ मारून नेली.