पिंपरी : शहरात १९ अनधिकृत प्राथमिक शाळांपैकी १३ शाळांवर शासन निर्णयानुसार दंडात्मक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी देऊनही अद्याप कारवाई झालेली नाही. महापालिका शिक्षण मंडळाच्या या उदासीन कारभारामुळे या शाळामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालकांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिका हद्दीत सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात शहरात एकूण १९ अनधिकृत प्राथमिक शाळा सुरू असल्याचे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या निदर्शनास आले. अशा अनधिकृत शाळांना शिक्षण मंडळाने अंतिम नोटीस २३ मार्च २०१५ ला बजावली होती. यापैकी तीन शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दोन शाळांना शासनाची मान्यता मिळाली आहे. एक शाळा न्यायप्रविष्ट आहे. या ६ शाळा वगळता उर्वरित १३ शाळांनी अद्यापही कोणत्याही प्रकारचा खुलासा सादर केलेला नाही. कारवाई करावी, असे आदेश आयुक्त जाधव यांनी २३ एप्रिल रोजी शिक्षण मंडळास दिले आहेत. आयुक्त जाधव यांनी आदेश देऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला. तसेच, येत्या सोमवारीपासून (दि. १५) शाळा सुरू होत आहेत. (प्रतिनिधी)अनधिकृत १३ शाळा ज्ञानराज प्राथमिक विद्यालय, शास्त्रीनगर, कासारवाडी. छत्रपती शिवाजी मेमोरियल स्कूल, गणेशनगर, बोपखेल. पुणे गुरुकुल इंग्रजी स्कूल, काळेवाडी. मायकेल प्ले गु्रप अॅण्ड नर्सरी, मोरया पार्क, पिंपळे गुरव. आनंदीबाई वाघेरे प्राथमिक बाल मंदिर, पिंपरी वाघेरे. ब्रिलियंट सिटी पब्लिक स्कूल, धावडेवस्ती, भोसरी. मास्टर केअर इंग्रजी स्कूल, आळंदी रस्ता, भोसरी. सरस्वती हॅप्पी चिल्ड्रन इंग्रजी स्कूल, माऊली सोसायटी, साई पार्क, दिघी. एंजल्स प्राथमिक शाळा, क्रांतीनगर, पिंपळे गुरव. बालविकास इंग्रजी स्कूल, गणेशनगर, थेरगाव. पुनरुत्थान समरसता गुरुकुल, केशवनगर, चिंचवड. ज्ञानसागर इंग्रजी स्कूल, सोनवणेवस्ती, तळवडे, चिखली. संत तुकाराममहाराज विद्यालय, भावेश्वर सोसायटी, मोरेवस्ती.
आयुक्तांचा आदेश; शिक्षण मंडळ ढिम्मच
By admin | Published: June 10, 2015 5:08 AM