लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्चअखेर विविध विकासकामांची वर्कऑर्डर काढून पुढील अर्थसंकल्पातील तरतुदीतून संबंधित कामांची बिले देण्याच्या प्रकाराला आळा घालण्याच्या पध्दतीला महापालिका आयुक्तांनी चांगलाच चाप बसविला आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामधील विकासकामांची वर्क ऑर्डर १९ मार्चपर्यंत काढण्यात यावी व या वर्षातील विकासकामांची बिलेही २५ मार्च,२०२१ पर्यंत सादर करण्याचे आदेशच आयुक्तांनी दिले आहेत़
याबाबतचे परिपत्रक आयुक्त कार्यालयाकडून बुधवारी सर्व खातेप्रमुखांना, उपायुक्तांसह पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना पाठविण्यात आले आहे़ यात सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या विकासकामांची बिले दि. २५ मार्च, २०२१ अखेर मुख्य लेखा व वित्त विभागाकडे ऑडिट व अदा करण्यासाठी पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच वरील मुदतीनंतर कोणतीही बिले स्वीकारणार नाहीत असेही स्पष्ट केले आहे़
या आदेशामुळे विविध क्षेत्रीय कार्यालयाकडून वर्षाअखेर म्हणजे मार्च महिन्यात विविध कामांची वर्क ऑर्डर काढून पुढील अर्थसंकल्पातील तरतुदीमधून त्या विकासकामांचा खर्च देण्याचा प्रकार आता बंद होणार आहे़ परिणामी, नगरसेवकांकडून क्षेत्रीय कार्यालयस्तरावर त्या वर्षाच्याअखेर म्हणजे मार्चमधील लाखो रूपयांच्या कामाची बिले देण्यासाठी, पुढील आर्थिक वर्षातील निधी देण्यास आयुक्त मंजुरी देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे़
दरम्यान, या आदेशामुळे पुढील काळात लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत़ या पार्श्वभूमीवर या आदेशाच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात महापालिकेतील पदाधिकारी व महापालिका आयुक्तांची बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे़
-----------------------------------------