पुणे : पुणे महापालिकेचे अधिकारी शहरातील आमदारांना सौजन्याची वागणूक देत नसल्याची तक्रार विधानसभा उपाध्यक्षाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने आमदाराशी संबंधित कामामध्ये अधिकाऱ्यांनी सौजन्याने वागावे असे आदेश दिले आहेत.
विधानसभेच्या उपाध्यक्षाकडे शहरातील आमदारांनी पालिकेच्या अधिकाऱ्याबददल तक्रारी केल्या आहेत. त्यात महापालिकेवर प्रशासक नियुक्तीनंतर कामे होत नाही. विकास कामांच्या बैठका आणि कार्यक्रमांना आमदारांना राजशिष्टाचारानुसार बोलविले जात नाही याचा समावेश आहे. राज्यसरकारकडे यापूर्वी २०१५, २०१८ तसेच २०२१ मध्ये याबाबत मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. त्यात, शहरातील सर्व लोकप्रतिनिधींना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देणे, त्यांच्याकडून आलेल्या पत्र, अर्ज, निवेदनांना पोहच देणे, त्यावर सत्वर कार्यवाही करणे, शासकीय कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना आमंत्रित करणे, त्यांचे नांव निमंत्रण पत्रिकेवर छापणे अशा सूचना आहेत.
मात्र, लोकप्रतिनिधींना विहित कालावधीत पोहच व उत्तर देण्याबाबत अधिकारी कर्मचारी यांच्याकडून टाळाटाळ व कुचराई केली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुध्द गंभीर दखल घेऊन शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश यापुर्वीच देण्यात आले आहेत. तरीही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी पालिकेतील सर्व खातेप्रमुख आणि विभागप्रमुख यांना पुन्हा सूचना केल्या आहेत. त्यानुसार २७ जुलै, २०१५ च्या परिपत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, सर्व लोकप्रतिनिधींना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देणे, त्यांचेकडून आलेल्या पत्र,अर्ज, निवेदनांना पोच देणे,त्यावर सत्वर कार्यवाही करणे, शासकीय कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना आमंत्रित करणे, त्यांचे नांव निमंत्रण पत्रिकेवर छापणे इत्यादीबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे विधानमंडळ सचिवालयाकडून प्राप्त होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विशेषाधिकार सूचनांवर देखील तातडीने कार्यवाही करुन त्याचा अहवाल विहित मुदतीत विधानमंडळ सचिवालयास पाठविण्याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.