पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या चौकशीसाठी आणखी एक समिती नेमण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या प्रकाराला नेमके कोण जबाबदार आहे याची चौकशी समितीकडून केली जाणार आहे.
विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच संकेतस्थळावर अपलोड झाल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतर याप्रकरणी सत्यशोधन समिती नेण्यात आली. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परीक्षा मंडळाची बैठक घेऊन या अहवालावर चर्चा घेण्यात आली. त्यानंतर हा विषय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आला. या बैठकीमध्ये याप्रकरणाच्या चौकशीसाठी आणखी एक समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष राजेश पांडे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्याचबरोबर डॉ. संजय चाकणे, डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. महेश आबळे हे या समितीचे सदस्य आहेत. ही समिती कारवाईच्या शिफारशीसह येत्या आठ दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे.
विधीचे पेपर कुणी अपलोड केले, ते कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आले याबाबतची माहिती चौकशी समिती प्रत्यक्ष संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. येत्या आठ दिवसांत हा तपास समितीकडून पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर काय कारवाई करावी याच्या शिफारशीसह तो सादर केला जाईल, अशी माहिती देण्यात आली.नोटीस बोर्डावर सूचना : फुटलेले पेपर ७ व ८ मार्च रोजीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागाचे फुटलेले पेपर ७ व ८ मार्च रोजी घेतले जाणार आहेत. ७ मार्च रोजी लॉ ऑफ क्राइम या विषयाचा पेपर होणार आहे. तर ८ मार्च रोजी ऑप्शनल विषयाचे पेपर होणार आहेत. विधी महाविद्यालयांनी त्यांच्या नोटीस बोर्डावर सूचना लावून याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना कळवली आहे. पेपरफुटीचा प्रकार अतिशय गंभीर आहे. विद्यार्थ्यांची चूक नसताना त्यांना पुन्हा परीक्षा द्यावे लागणे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी व्यवस्थापन परिषदेच्या काही सदस्यांनी केली. त्यानंतर याप्रकरणी आणखी एक चौकशी समिती नेमून त्याचा सखोल तपास करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये अभाविपकडून गोंधळसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाने घेतलेला फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा, परीक्षा विभागाच्या संचालकांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी अभाविपकडून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये गोंधळ घालण्यात आला. गोंधळ घालणाºया कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन चतु:शृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.