पुणे : दिव्यांग विद्यार्थ्यांना केवळ लेखनिक किंवा जादा वेळ देण्यासाठीच स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. ही समिती दिव्यांग प्रमाणपत्र देत नाही. त्यामुळे ससून रुग्णालय अधिक्षकांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर अविश्वास दाखविलेला नाही. समिती नियुक्तीचा निर्णय २०१४ मध्येच घेण्यात आला आहे, असे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लेखी परीक्षेदरम्यान जादा वेळ मिळावा, यासाठी विद्यापीठाकडे अर्ज करण्यात आला आहे. या अर्जासोबत ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी विद्यार्थ्याच्या हाताला दुखापत झाल्याचे प्रमाणपत्रही जोडले आहे. मात्र, विद्यापीठाने शहरातील खासगी रुग्णालयामध्ये तपासणी करण्याबाबत संबंधित विद्यार्थ्याशी पत्रव्यवहार केला आहे. याला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी आक्षेप घेत रुग्णालयावर अविश्वास दाखविल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. डॉ. चंदनवाले यांच्या दावा विद्यापीठ प्रशासनाने फेटाळला आहे.विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जादा वेळ किंवा लेखनिक देण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्याचा निर्णय २०१४ मध्येच झालेला आहे. त्यावेळी ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अरूण जामकर हे विद्यापीठाचे कुलगुरू होते. तेव्हापासून ही समिती संबंधित विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेते. त्यापुर्वी परीक्षा नियंत्रकांकडे हे अधिकार होते. मात्र, काही विद्यार्थी खोटी प्रमाणपत्र देत होती. हे प्रमाणपत्र कोणाकडूनही आणले जात होते. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये २०१४ मध्ये समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती विद्यार्थ्यांची शारिरीक स्थिती पाहून परीक्षेसाठी किती जादा वेळ द्यायचा किंवा लेखनिक द्यायचा की नाही, याबाबत निर्णय घेते. विद्यार्थ्याला दिव्यांग प्रमाणपत्र देत नाही. त्यामुळे ससून रुग्णालयावर अविश्वास दाखविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले. -------------दिव्यांग विद्यार्थ्यांना जादा वेळ किंवा लेखनिक देण्यासाठी नियुक्त समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश आहे. विद्यापीठानेच या तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या खासगी रुग्णालयालामध्ये ही समिती संबंधित विद्यार्थ्यांना बोलावते. समितीमध्ये या रुग्णालयासह अन्य वैद्यकीय महाविद्यालयांमधील तज्ज्ञांचा समावेश आहे. समितीच्या निर्णयानुसार संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान जादा वेळ किंवा लेखनिक दिला जातो. - डॉ. कालिदास चव्हाण, कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ---------------------आरोग्य विज्ञान विद्यापीठ : केवळ जादा वेळ, लेखनिकाचा निर्णयबी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले हे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत. विद्यार्थ्यांना लेखनिक किंवा जादा वेळ देण्याबाबत खासगी रुग्णालयांमध्ये समिती देण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार करण्यासाठी परिषदेच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.
समिती दिव्यांग प्रमाणपत्र देत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 2:09 PM
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लेखी परीक्षेदरम्यान जादा वेळ मिळावा, यासाठी विद्यापीठाकडे अर्ज करण्यात आला आहे.
ठळक मुद्देआरोग्य विज्ञान विद्यापीठ : केवळ जादा वेळ, लेखनिकाचा निर्णय दिव्यांग विद्यार्थ्यांना जादा वेळ किंवा लेखनिक देण्यासाठी नियुक्त समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश