पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या वचननाम्यातील घोषणांची अंमलबजावणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून चांगल्या पध्दतीने व्हावी यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीकडून यावर लक्ष ठेवले जाईल अशी घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी केली. पुणेकरांचे प्रश्न एकमुखाने सोडवू अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. महापालिकेमध्ये भाजपाकडून महापौरपदासाठी मुक्ता टिळक तर उपमहापौर पदासाठी रिपाइंचे नवनाथ कांबळे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.गिरीश बापट म्हणाले, ‘‘भाजपा व रिपाइंकडून महापौर व उपमहापौर पदासाठी दिलेले उमेदवार निश्चितपणे १५ मार्चला निवडून येतील. महापालिकेच्या इतिहासामध्ये भाजपाला आतापर्यंत उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशी अनेक पदे मिळाली होती, मात्र महापौर पद मिळू शकलेले नव्हते. पालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजपाला महापौरपद मिळणार आहे.’’महापालिकेमध्ये पुणेकरांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याबरोबरच विकास कामांचे मोठे प्रकल्प मार्गी लावण्यावर भाजपाकडून भर दिला जाईल. पुणे महापालिकेचा कारभार आदर्श पध्दतीने चालला पाहिजे यासाठी पुढाकार घेणार आहोत. त्यासाठी नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार केली आहे असे बापट यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)उपलोकायुक्त नेमण्यास पालकमंत्री अनुकुलमुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शीपणे व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथल्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी उपलोकायुक्त यांची नेमणूक केली आहे. शिवसेनेनेही उपलोकायुक्त केवळ मुंबईसाठी का नागपुरसह इतर महापालिकांवरही उपलोकायुक्त नेमा अशी मागणी केली होती. त्याचबरोबर भाजपाचे खासदार अनिल शिरोळे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे पुणे महापालिकेत उपलोकायुक्त नेमण्याची मागणी केली आहे. यापार्श्वभुमीवर गिरीश बापट यांच्याकडे उपलोकायुक्त नेमण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उपलोकायुक्तांचे कामकाज ही दैनंदिन प्रक्रिया आहे असे सांगून पुण्यातही उपलोकायुक्त नेमण्यास अनुकुलता दर्शविली आहे.
वचननामा अंमलबजावणीसाठी समिती
By admin | Published: March 09, 2017 4:18 AM