लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातून विशेषत: जुन्या पुण्यातून फिरताना एखाद्या जुन्या इमारतीवर ‘अमुकअमुक हे या ठिकाणी इसवी सन ...ते .... पर्यंत राहत होते’ असा निळ्या रंगाचा फलक पाहिला की पावले तिथेच काही वेळ रेंगाळतातच. संबंधित थोरामोठ्यांच्या स्मृती जागृत होतात. मिनिटभर का होईना जुन्या काळात जाऊन आल्याचा आनंद मिळतो.
हा आनंद जी समिती देत होती ती समिती गेली काही वर्षे आता अस्त्विहीन झाली आहे. या समितीच्याच स्मृती नव्या-जुन्या पुणेकरांना जागवाव्या लागत आहेत. पुण्यातील शंभरपेक्षा जास्त वास्तूंवर समितीच्या माध्यमातून छान गोलाकार निळ्या रंगाचे फलक लावले गेले होते. ते फलकही आता मोडकळीस आले आहेत. कितीतरी वर्षांत नवे फलक लागलेले नाहीत. त्यामुळे हा एक चांगला उपक्रम विस्मृतीत चालला आहे.
विधान परिषदेचे तत्कालीन सभापती जयंतराव टिळक यांच्या प्रयत्नांमधून ही समिती साकार झाली होती. इंग्लंडला गेल्यानंतर टिळक यांनी ‘नीलफलका’ची संकल्पना पाहिली. ही संकल्पना पुण्यातही राबवावी जेणेकरून नव्या पिढीला जुन्या पुण्याची, पुण्यातील थोरामोठ्यांची ओळख होत राहील, हा उद्देश त्यामागे होता. उत्साहाने त्यांनी तो त्वरित अमलात आणला. माजी आमदार उल्हास पवार, प्रा. जयप्रकाश जगताप, गोखले आदी काही जणांची एक समिती तयार करण्यात आली. खुद्द जयंतराव टिळक यांच्याच उपस्थितीत मग पुण्यातील अनेक वास्तूंवर नीलफलक झळकले. जगप्रसिद्ध सर्कसपटू दामू धोत्रे यांच्यापासून ते गानहिरा हिराबाई बडोदेकरांपर्यंत अनेक नामवंतांचा यात समावेश आहे.
सन ८० ते ९० च्या दशकात शंभरपेक्षा जास्त व्यक्तींच्या निवासस्थानी असे फलक लागले. त्याचा कार्यक्रम होत असे. संबंधित व्यक्तीच्या नातेवाइकांची त्याला उपस्थिती असे. त्यातून इतिहासाला उजाळा मिळत असे. पुण्याच्या पावलावर पाऊल ठेवत नंतर अहमदनगर व अन्य काही शहरांतही हा उपक्रम सुरू झाला. पुण्यातील उपक्रम मात्र जयंतराव टिळक यांच्या निधनानंतर थांबला तो थांबलाच. आता जुने नीलफलकही मोडून पडू लागले आहेत.