सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी गावातील सर्व पक्षाच्या व सर्व गटांच्या लोकांनी आज एकत्र येत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी चौदा जणांच्या समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे.
खंडोबाचीवाडी या ग्रामपंचायतीची १९८६ पासून आजपर्यंत फक्त एकदाच म्हणजे सन २००० मध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती. निंबूत ग्रामपंचायतीत तत्पूर्वी ही ग्रामपंचायत होती. त्यानंतरही काकडे गट व राष्ट्रवादीचा गट किंवा राष्ट्रवादीतलेच दोन गट असा संघर्ष पहायला मिळत होता. त्यामुळे छोट्या असलेल्या खंडोबाच्यावाडीची निवडणूक प्रतिष्ठेची बनत होती. या छोट्याशा गावात कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्यपद मिळालेले आहे. यामुळे आता यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष शैलेश रासकर, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे, समता पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप फरांदे, सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मदने, दादा मदने, दादा लकडे, बाळासाहेब महानवर, धनंजय गडदरे, अनिल लकडे, अशोक किसनराव मदने पाटील, गणेश पवार यांच्यासह शंभरच्या आसपास ग्रामस्थ उपस्थित होते.
आताची निवडणूक बिनविरोध करायची. त्यासाठी सात सदस्य निवडावे लागणार आहेत. यासाठी चौदा जणांची समिती तयार केली आहे. ही समिती आजपासूनच वार्डनिहाय इच्छूक लोकांच्या बैठका घेणार आहे. या बैठकांनंतर लोकशाही पध्दतीने सदस्याची निवड करणार आहे. आतापर्यंत ज्यांना संधी मिळालेली नाही अशाच नव्या तसेच सुशिक्षित चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. आणि जे गावाच्या निर्णयास विरोध करतील त्यांना संपूर्ण गाव विरोध करेल, असा निर्णय झाला असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर व माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी ग्रामस्थांच्या बिनविरोध निवडणुकीच्या निर्णयावर समाधान व्यक्त करत स्वत:च्या जिल्हा परिषद फंडातून दहा लाख रुपये बक्षीस देणार असल्याचे असे जाहीर केले. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडूनही बक्षीस प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले.