पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेक विद्यार्थ्यांना ईच्छा असूनही आपल्याला हव्या असणाऱ्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. त्यातच यंदा शाळेचा निकाल शंभर टक्के लागण्याची शक्यता आहे. परिणामी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने या सर्वबाबींचा विचार करून प्रवेश प्रक्रियेबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व घटकातील प्रतिनिधींना एकत्रित करून समिती स्थापन करावी, अशी मागणी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.शामकांत देशमुख, डॉ. संजय खरात ,दादाभाऊ शिनलकर, शशिकांत तिकोटे, संतोष ढोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
समितीमध्ये विद्यापीठ अधिकार मंडळातील सदस्य तसेच संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या समावेश करावा, असे निवेदन या सर्व अधिसभा सदस्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना दिले.