पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीयवादी पक्ष आहे. एकेकाळी राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला हा पक्ष आता स्थानिक पातळीवर आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणारा हा पक्ष नावात राष्ट्रवाद असून छुपा जातीयवादी आहे, असा घणाघात महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत स्वराज्य स्थापनेसाठी मोलाची कामगिरी बजावलेल्या पुण्यातील शेकडो सरदार घराण्यांचा वंशजांचा कोथरूड येथे मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात सरदार घराण्यांनी पुणे शहर लोकसभा मतदार संघातून गिरीश बापट तसेच बारामती मतदार संघातून कांचन कुल यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दर्शविला. बापट म्हणाले की, छत्रपतींचा आदर्श घेऊन सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षात प्रयत्न केले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात मी कधीच भेदभाव केला नाही. म्हणूनच अठरा पगड जातीचे वर्चस्व असणाºया कसबा मतदार संघातून ५ वेळा मी निवडून येऊ शकलो. ज्या सरदारांनी स्वराज्याच्या स्थापनेत योगदान दिले त्यांचे नाव घेताना सुद्धा ऊर अभिमानाने भरून येतो, असेही बापट यावेळी म्हणाले.बापट म्हणाले की, छत्रपतीं शिवाजी महाराजांनी जात, पात, धर्म, वंश अशा कोणत्याच भेदभावाला थारा न देता स्वराज्यातून सुशासनाचा आदर्श मांडला. परंतु, विरोधक शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जातीय राजकारण करत आहे. छत्रपतींच्या नावाने जातीचे राजकारण म्हणजे त्यांच्याच विचारांशी प्रतारणा करण्यासारखे आहे आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यांना आम्ही आदर्श मानतो. याचा त्यांना मात्र त्रास होतो. शिवाजी महाराजांचे नाव आम्ही घेतल्यावर यांच्या पोटात का दुखते? असा सवाल ही बापट यांनी उपस्थित केला. या मेळाव्यात माजी खासदार प्रदीप रावत, माजी आमदार रंजना कुल, शरद ढमाले, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक सुशील मेंगडे, दिलीप वेडे पाटील, दीपक पोटे, अल्पना वरपे, सुनील मारणे, छाया मारणे, आदी उपस्थित होते.
जातीयवादी " राष्ट्रवादी " ची अस्तित्वासाठी धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 7:56 PM
छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणारा हा पक्ष नावात राष्ट्रवाद असून छुपा जातीयवादी आहे.
ठळक मुद्देस्वराज्य स्थापनेसाठी मोलाची कामगिरी बजावलेल्या शेकडो सरदार घराण्यांच्या वंशजांचा मेळावा