पुणे : प्रचंड दुर्गंधी, अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य अशी सर्वसाधारणपणे परिस्थिती असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांटा चेहरामोहरा महापालिकेच्या वतीने बदलून टाकण्यात येणार आहे. ही स्वच्छतागृहे आता बँका, बचत गट, लहान मुलांच्या कार्यक्रमांचा हॉल असे बहुउपयोगी केंद्र बनविले जाणार आहे. सर्व स्वच्छतागृहांचे कम्युनिटी सेंटर बनविण्याचे काम पूर्ण करण्यासाठी २६ जानेवारी २०१७ ही डेडलाईन निश्चित करण्यात आली, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी दिली.शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये वैयक्तिक शौचालये उभारण्याची मोठी मोहीम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत २० हजार शौचालये बांधून झाली आहेत. येत्या काळात आणखी २१ हजार शौचालये बांधली जाणार आहेत. वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी केंद्र व राज्य शासन तसेच महापालिकेच्या वतीने अनुदान देण्यात येते. महापालिकेने वैयक्तिक शौचालय उभारण्यात देशात आघाडी घेतली आहे. मात्र, झोपडपट्ट्यांमधील काही घरे खूपच छोटी आहेत, त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालये पालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महापालिकेच्या वतीने नवीन सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण तयार करण्यात आले आहे. याअंतर्गत समग्र या संस्थेच्या मदतीने या स्वच्छतागृहांचे रूपडे पालटले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर खैरेवाडी येथे एका स्वच्छतागृहाचे कम्युनिटी सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले, त्याचे २ आॅक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. एका कुटुंबाला केवळ ८० रुपये शुल्कमहापालिकेच्या वतीने बनविण्यात येणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृह व कम्युनिटी सेंटरमधील सुविधांचा लाभ घेण्यासाठी एका कुटुंबाकडून महिन्याला केवळ ८० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामध्ये त्यांना अत्यंत स्वच्छ स्वच्छतागृह व त्याचबरोबर इतर सुविधा मिळणार आहेत. या स्वच्छतागृहांचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी पॉर्इंट सिस्टीम असेल. या पॉर्इंटचा वापर विविध प्रकारच्या खरेदीमध्ये सवलतीसाठी करता येणार आहे.सर्व स्वच्छतागृहांचे केंद्रीकरणशहरातील सर्व स्वच्छतागृहे, त्यांची अवस्था, त्याबाबत नागरिकांचा फिडबॅक, त्यांचा होणारा वापर आदी सर्व माहितीचे एकत्रीकरण करून ती डॅशबोर्डवर प्रशासनाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर, स्वच्छतागृहांमधील डॅशबोर्डवर ती प्रकाशितही केली जाईल.२६ जानेवारीनंतर महिला स्वच्छतागृहांची समस्या संपेलमहिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न खूपच गंभीर आहे. याबाबत स्वयंसेवी संस्थांकडून वेळोवेळी आवाज उठविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात महिलांसाठी कुठे स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे, त्याचा सर्व्हे करण्यात आला आहे. अशी एकूण १६७ ठिकाणे आढळून आली असून, तेथे तातडीने महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारली जातील. येत्या २६ जानेवारीनंतर महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न उरणार नाही, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक स्वच्छतागृहे बनणार कम्युनिटी सेंटर
By admin | Published: September 30, 2016 4:55 AM