मांजरी - लग्नाचा अनाठायी खर्च सर्वसामान्य गरीब कुटुंबाला आजच्या काळात न परवडणारा असून मुलांच्या लग्नकार्यात अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात. या कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावासा वाटतो. ही जीवघेणी मानसिकता बदलून गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे शुभविवाह लोकवर्गणीतून सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून लावले, तर सर्व खर्च वाचून गरिबांचा संसार उभा राहील, असे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.भारतीय जनता पार्टी व शिवसेना तसेच छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक समिती, क्रांती मित्र मंडळ मांजरी बुद्रुक यांच्या वतीने मोफत सर्व धार्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार योगेश टिळेकर, कात्रज दूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के, जिल्हा परिषद सदस्या वंदना कोद्रे, बाजार समिती उपसभापती भूषण तुपे, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच अमित घुले, बाळासाहेब घुले,प्रतीक घुले व्यासपीठावर उपस्थित होते.देशमुख म्हणाले, सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी संपूर्ण राज्यात जनजागृतीची आवश्यकता असून यामुळे शेतकरीदेखील लग्नाच्या खर्चामुळे कर्जबाजारी न होता सुखाने आनंदाने शेती करेल.सामुदायिक विवाह सोहळ्याचे संयोजक बाळासाहेब घुले, प्रतीक घुले यांनी सलग पाच वर्षे हा उपक्रम यशस्वी राबवल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
लोकवर्गणीतून सामुदायिक विवाह सोहळे व्हावेत - सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 3:23 AM