पुणे:पुणे महानगरपालिकेत आज राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी भेट दिली. जिल्ह्यातील महिलांच्या समस्या सोडवण्याची सुरुवात चाकणकर यांनी केली. महापालिका महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर रुपाली चाकणकर यांनी लक्ष देत संबंधित महिलांना न्याय देण्यासाठी त्यांनी कमिटी देखील तयार केली आहे. सोबतच, जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातही तिथल्या महिला अधिकाऱ्यांना महिलांच्या समस्येबाबत कारवाई करण्यासाठी कमिटी गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयात अशा प्रकारची कमिटी नसेल तर ५० हजार रुपये दंड करण्यात येईल, असा कडक पावित्रा चाकणकर यांनी घेतला आहे.
शिवाय, जिल्ह्यातील महिला स्वच्छतागृहांबाबतही चाकणकर यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. महिला स्वच्छतागृहांमध्ये केअर टेकर जर महिला नसेल, पुरुष केअर टेकरकडून कोणत्याही प्रकारचा त्रास दिला गेला असेल तर त्या महिलांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करावी. महिला स्वच्छतागृहांना सुधारलं जाईल असंही त्या म्हणाल्यात. तेजस्विनी या महिला स्पेशल बसमधून कधीही कोणत्याही पुरुषानं प्रवास करणं चालणार नाही. तसं आढळल्यास महिला आयोग, pmpml कार्यालय यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल. pmpml मध्ये मोठ्या प्रमाणावर अनुकंप तत्वावर महिला कर्मचारी आहेत.
स्वारगेट, हडपसर, कात्रज, कोथरूड या प्रमुख चार ठिकाणी महिला स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्या ठिकाणी संबंधित pmpml अधिकाऱ्यांनी लक्ष घालून स्वच्छतागृह वापरण्यायोग्य करून घ्यावीत, कचरा साफ करून घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, कामावरून काढून टाकण्याच्या, काम न मिळण्याच्या, करिअर संपण्याच्या भीतीनं महिला त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत नाहीत. या सगळ्या मुद्द्यांचीही काळजी घेत घटना हाताळल्या जातील. असा विश्वास चाकणकर यांनी दिला.
खासगी किंवा सरकारी यंत्रणेत किंवा कंपनीत काम करणाऱ्या महिलांवरील अत्याचाराबाबत त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयात त्या तक्रार दाखल करू शकतील. त्यांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. त्रास देणारी वरिष्ठ महिला अधिकारी असेल तरी ती आरोपीच आहे, म्हणून तिच्यावरही कारवाई केली जाईल. कंपनीचा दोष आढळल्यास कंपनी टर्मिनेट करण्यात येईल. त्रास देणारे अधिकारी, बॉस यांना त्यांच्या पदावरून हात धुवावा लागेल. महिला समस्या, त्रास, अत्याचार यांबाबत राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर आक्रमक पावित्र्यात आहेत.