आळंदी (पुणे) : तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात शनिवारी (दि.२३) दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. मात्र सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान दोन्ही ठिकाणी आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाने तात्काळ जाऊन आग आटोक्यात आणण्यात यश आले.
चऱ्होली बुद्रुक येथे दाभाडे सरकार चौकासमोर दुपारच्या सुमारास एका ट्रकला आग लागली. आगीची माहिती मिळताच आळंदी नगरपरिषद अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली. यामध्ये ट्रकचे नुकसान झाले. तर सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास धानोरे फाटा येथील पगडे वस्तीवरील ग्रोवेल कंपनीला आग लागली. याठिकाणी आगीची तीव्रता अधिक प्रमाणात होती. आगीची माहिती आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाने तात्काळ अग्निशमन वाहन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून अगदी कमी वेळात आग आटोक्यात आणली.
दरम्यान आगीमुळे कंपनीतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.मात्र या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे व अग्निशमन विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलातील फायरमन प्रसाद बोराटे, तुळशीराम कोळपे, विनायक सोळंकी, अक्षय त्रिभुवन यांनी उत्तम कामगिरी करत दोन्ही घटनांमध्ये आग विझविण्यात यश मिळविले.