पुणे : कंपनीने स्वॉफ्टवेअर प्रॉडक्ट सोर्स कोडचा अॅक्सेस दिला असताना त्याचा व बौद्धिक संपदेचा गैरवापर करुन परस्पर परदेशी कंपनीचे कंत्राट मिळवून कंपनीचे साडेचार कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी निलेश जवेरचंद जैन (वय ४७, रा.दादर, मुंबई) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी न्युरोनेट बोटस या कंपनीचे विजय तन्नीरु (रा. डोंबिवली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाणेर येथील क्लिनीवेटेंज हेल्थकेअर टोक्नॉलॉजी या कपंनीत २४ आॅक्टोबर २०१९ पासून घडला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, विजय यांनी निलेश यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या कंपनीशी नॉन डिस्क्लोजर, नॉन सोलिसिटेशन व नॉन कम्पीट करार केला आहे, असे असताना लंडन येथील हेल्थकोड लि. या कंपनीकडून फिर्यादीच्या कंपनीस मिळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टसाठी परस्पर स्वत:चे फायद्यासाठी या कंपनीशी संपर्क साधला. फिर्यादीचे कंपनीकडून त्यांना काम करण्यासाठी विश्वासाने अॅक्सेस देण्यात आला होता. सॉफ्टवेअर प्रॉडक्ट सोर्स कोडचा गैरवापर करुन त्यांनी स्वत:चे कंपनीसाठी कमी रक्कमेचे कंत्राट मिळविले. फिर्यादीच्या बौद्धिक संपदेचा गैरवापर केला व फिर्यादीची फसवणूक करुन ४ कोटी ५० लाख रुपयांचे कंपनीचे नुकसान केले.