चाकण : औद्योगिक वसाहतीमधील वाघजाईनगर येथील पार्कसन पॅकेजिंग कंपनीत दोन कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर काहींना लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.यामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. परंतु, एवढी मोठी घटना घडूनही तालुका प्रशासनाला याची पुसटशी कल्पना देखील नाही. कंपनीकडून सुद्धा प्रशासनाला घडलेल्या गंभीर प्रकाराबाबत अंधारात ठेवण्यात आले आहे.
राज्य सरकारने औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करून कंपनी चालू ठेवण्यासाठी मुभा दिली आहे. पण वसाहतीतील बहुतेक कंपन्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. वाघजाईनगर येथील पार्कसन पॅकेजिंग कंपनीत जवळपास एक हजार कामगार काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीतील काही कामगारांना कोरोनाचे संक्रमण झाल्याने दोन कामगारांचा यात मृत्यू झाला आहे.या कामगारांच्या मदतीसाठी गेलेल्या कामगारांवर कंपनी व्यवस्थापनाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कामावरून कमी केले आहे.
या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी पार्कसन पॅकेजिंग कंपनीत गेलेल्या तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच चक्क कंपनी व्यवस्थापनाने चुकीची माहिती देत त्यांना अरेरावी करत कंपनीच्या बाहेर जाण्यास भाग पाडले.कंपनीच्या कामगारांकडून संबधित अधिकाऱ्यांना अत्यन्त धक्कादायक माहिती मिळावी.पार्कसन पॅकेजिंग कंपनीत कोणत्याही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नाही. कोणत्याही कामगारांसाठी कंपनीकडून कोरोना प्रतिबंधक साहित्य पुरवले जात नाही त्यामुळे कंपनीत मोठे कोरोना संक्रमण झाले असल्याचे कामगारांनी बोलून दाखवले.
पार्कसन पॅकेजिंग कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतेही उपाययोजना केल्या नसल्यानेच दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असून कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे.असे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. कंपनीत नक्की कामगारांच्या जीवाशी किती खेळले जात आहे हे धक्कादायक दृश्य समोर आले आहे.
* खेड तालुक्यात एमआयडीसीमधील कपन्यांमुळेच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे नागरिक बोलत आहेत.अनेक कंपन्या केवळ उत्पादन काढण्यात मग्न असून कामगारांच्या सुरक्षेसाठी काहीही करत नाही.मागील काही दिवसांपूर्वी एका कंपनीत होम कॉर्नटाइनचे शिक्के मारलेले कामगार कंपनीत काम करत होते. हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करूनही तालुका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई संबधित कंपनीवर केले नाही.