लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेत मालकवर्गाने कामगारांंना त्रास देऊ नये, असा इशारा शिवसेनेचे उपनेते, भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी दिला.
भारतीय कामगार सेना या सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे ते म्हणाले. पिरंगुट येथील खासगी कंपनीमधील भारतीय कामगार सेनेच्या नवीन युनिट नामफलकाचे उद्घाटन डॉ. कुचिक यांच्या हस्ते झाले. तुकाराम केमसे, बाळू नरवडे, जीवन शिंदे, श्याम भेगडे, रवींद्र सातव, बाळासाहेब चांदेरे, नानासाहेब शिंदे, भानुदास पानसरे, राम गायकवाड, नवनाथ भेगडे उपस्थित होते. कारखान्याची उन्नती व्हावी, यासाठी कामगार काम करतात. त्याचे मोल त्यांना दिलेच पाहिजे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक उद्योगांनी वर्षानुवर्षे काम करीत असलेल्या कायम कामगारांनाही कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून थेट कमी करण्यात येत आहे. अशा स्वार्थी पद्धतीने काम करणाऱ्या उद्योगांवर भारतीय कामगार सेनेची करडी नजर आहे, असे डॉ. कुचिक म्हणाले.