पुणे : स्मार्ट सिटीमधील ज्या मुद्द्याला राजकारण्यांकडून सर्वाधिक विरोध झाला त्या स्वतंत्र कंपनीच्या नोंदणीचा महापालिकेला होळीचा मुहूर्त मिळाला. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड असे या कंपनीचे नामकरण करण्यात आले असून, त्याच नावाने कंपनी कायद्यातंर्गत नोंदणी करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीतील सर्व कामे आता या कंपनीमार्फत केली जातील.महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. मागील ७ महिने स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिका प्रशासन परिश्रम करीत होते. कंपनीच्या स्थापनेमुळे आता या प्रकल्पाला कायदेशीर स्वरूप मिळाले आहे. लवकरच कंपनीची पहिली सभा आयोजित करण्यात येऊन त्यात सुरुवातीच्या कामांची दिशा ठरवण्यात येईल. या प्रकल्पातील नागरिकांच्या सहभागाचे फक्त दिल्लीतूनच नाही तर परदेशांतूनही कौतुक झाले आहे. पुणेकरांनी पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीच्या निवडीबाबत पुणेकरांनी दाखविलेला सहभाग महत्त्वाचा आहे. मात्र, स्मार्ट सिटीसंबंधीची कामे करण्यासाठी वेगळी कंपनी स्थापन करण्यात येणार होती. या कंपनीवरून अनेकांनी आक्षेपही घेतला होता. मात्र, या कंपनीच्या नोंदणीला होळीचा मुहूर्त मिळाला आहे. (प्रतिनिधी)केंद्र सरकारचे या वर्षासाठीचे योजनेचे अनुदानही कंपनीच्या खात्यात जमा होईल. त्यात राज्य सरकार व महापालिकेचा हिस्सा जमा करून कामांना त्वरित सुरुवात करता येईल, असा विश्वास आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केला.नागरिकांना केंद्रबिंदू मानून पारदर्शकपणे व कार्यक्षमेते सर्व काम होईल. महापौरांसह महापालिकेचे ६ व केंद्र, राज्य सरकारचे ९ असे एकूण १५ संचालक कंपनीत असतील. कंपनीत ६ जण महापालिकेचे तर विभागीय आयुक्त राज्य सरकारचे असे एकूण ७ भागधारक असतील. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची निवड कंपनीच्या पहिल्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. ही निवड कशी करायची, खासगी क्षेत्रातून करायची की सरकारी क्षेत्रातून याबाबतचा निर्णय त्या बैठकीत होऊन त्याची त्वरित अंमलबजावणी केली जाईल.- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका
स्मार्ट सिटीसाठी कंपनीची नोंदणी
By admin | Published: March 25, 2016 3:52 AM