पुणे : राज्यात होणारी मेगा भरती ही महापोर्टलमध्ये झालेल्या भ्रष्टाचारानंतर थांबविण्यात आली होती. त्यामुळे लाखो तरुण चिंताग्रस्त व संभ्रमावस्थेत होते. या भरतीसाठी नवीन कंपनी निवड महाआयटीकडे देण्यात आली आहे. जवळपास एक वर्षांपासून ही कंपनी निवड प्रलंबित होती. मात्र, आता पुढील दोन दिवसात अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचा अखेर महाआयटीने खुलासा केला आहे.
साधारण ३२ लाख तरुणांचे भवितव्य अवलंबून असणारी सरळ सेवा भरती प्रक्रिया वेग घेत आहे. या अंतर्गत होणारी कंपनी निवड अंतिम टप्प्यात असून पुढील दोन दिवसात ती होणार असल्याचे महा आयटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव याबाबत गेल्या काही महिने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी याबाबतचा लेखी खुलासा मागितला होता. हा खुलासा देतांना महा आयटीने याबाबत स्पष्टता दर्शवली आहे. त्यामुळे लाखो तरुणांना दिलासा मिळाला आहे. महा आयटीकडून मिळालेलं हे खुलासा पत्र यादव यांनी त्यांच्या ट्विटरवरून प्रसिद्ध केले आहे.
या पत्रात नमूद केल्याप्रमाणे पुढील दोन दिवसात ही कंपनी निवड झाल्यास, सरळ सेवा भरती प्रक्रियेस वेग येणार आहे. राज्यभरातील असंख्य विभागांची गट क आणि ड पदांची पद भरती या अंतर्गत करण्यात येणार आहे.