पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसपीपीयु एज्युटेक फाऊंडेशन या कंपनीकडे विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याची जबादारी दिली आहे. या कंपनीने तांत्रिक सपोर्टसाठी निविदा मागविल्या. त्यानुसार पाच कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. येत्या दोन दिवसात त्यातील एक कंपनी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यातील कोणत्या कंपनीला एसपीपीयु एज्युटेक मदतीला घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यातील सुमारे साडे सहा लाख विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या ११ एप्रिल पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्राध्यापकांकडून प्रश्न संच जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आत्तापर्यंत ६० टक्के प्रश्न संच जमा झाले असून उर्वरित प्रश्न संच येत्या २७ मार्चपर्यंत जमा होती, असा अंदाज परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
विद्यापीठाने परीक्षेच्या कामासाठी एजन्सी निवडीच्या प्रकियेत विलंब केला. त्यामुळे १५ मार्च पासून सुरू होणाऱ्या परीक्षा ११ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याची वेळ विद्यापीठ प्रशासनावर आली. परिणामी विद्यापीठाने स्वत:च्याच कंपनीला परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवली. यापूर्वी विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेच्या कामात विद्यापीठाच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी सहयोग दिला होता. त्यामुळे विद्यापीठाची कंपनी परीक्षा घेऊ शकते का? याबाबत चाचपणी करण्यात आली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर कंपनीने परीक्षेबाबत सादरीकरण केले. त्यानंतर कंपनी परीक्षा घेऊ शकते, असा विश्वास सर्व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केला. त्यामुळे परीक्षेची जबाबदारी कपनीकडे देण्याचे निश्चित करण्यात आले.
विद्यापीठाच्या कंपनीने परीक्षेची जबाबदारी स्वीकारली असली तरी काही तांत्रिक सपोर्टसाठी दुसऱ्या कंपनीचे सहकार्य घेण्यासाठी या कंपनीने निविदा मागविल्या. त्यामुळे दुसऱ्या कंपनीचा ‘प्लॅटफॉर्म’ वापरून परीक्षा घेण्याचे निश्चित केले. कंपनीकडे ५ कंपन्यांनी निविदा सादर केल्या. या सर्व कंपन्यांनी मंगळवारी सादरीकरण केले. त्यातील तीन कंपन्यांची निवड करून एका कंपनीकडून तांत्रिक सपोर्ट घेतला जाणार आहे.
--
... तर गोंधळाची पुनरावृत्ती होऊ शकते
विद्यापीठाच्या कंपनीला कामाचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे मदतीसाठी घेतल्या जाणाऱ्या कंपनी तरी परीक्षेच्या कामाचा चांगला अनुभव असला पाहिजे. अन्यथा अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे विद्यापीठाची कंपनी तांत्रिक सपोर्टसाठी कोणाला बरोबर घेते. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.