पुणे : गेल्या सव्वा महिन्यांपासून कोरोना विरुद्धच्या या लढाईत रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त डॉ.के़. व्यंकटेशम यांनी एक भावनिक साद घालणारे पत्र लिहिले असून त्यात त्यांनी ज्या सेवाभावी वृत्तीने आपले कर्तव्य बजावत आहात याची तुलना युद्धभूमीशीच करावी लागेल, अशा शब्दात गौरव केला आहे. इतर वेळी पोलिसांच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या जनतेने कोरोनाविरुद्धच्या लढाईतील कामाचे तोंड भरुन कौतुक केले आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या या कामगिरीचा पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी खुले पत्र देऊन त्यांच्यातील आत्मविश्वासाला अधिक बळ दिले आहे.
या पत्रात पोलीस आयुक्त म्हणतात....नमस्कार, माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो....पोलिस दलाचा खरा कणा असलेले तुम्ही सर्व जण ज्या धीराने सध्या कर्तव्य बजावत आहात, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शब्द कमी पडत आहेत. गेला सव्वा महिना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिस म्हणून आपण कर्तव्य पार पाडत आहात. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करताना नाक्या-नाक्यावर , चेकिंग पाईंटवर , वाड्या वस्त्यांमध्ये जावून उन्हातान्हाची तमा न बाळगता रात्रंदिवस ज्या कर्तव्यभावनेने आणि सेवाभावी वृत्तीने आपले कर्तव्य बजावत आहेत, त्याची तुलना युद्धभूमीशीच करावी लागेल. आपण आपले कर्तव्य पार पाडत असताना, योग्य ती काळजी घ्यायला हवी. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळायला हवेत. कर्तव्यावर वारंवार मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला हवा. पुढील काही काळ आपण ही गोष्ट पोलिस दलातील शिस्तीप्रमाणेच न विसरता अंमलात आणायवयाची आहे, हे आपल्या सर्वांना नम्र आवाहन....
आपण सर्व जण एक कुटुंब आहोत. सध्याच्या कठीण काळात आपली संघभावना, सचोटीव सेवाभावी वृत्ती ही सर्व प्रकारच्या आव्हानांवर मात करण्यात यशस्वी होईल.सुरक्षा साधनांचा उपयोग करून स्वत:ची व आपल्या समाजाची काळजी घेऊन तोरोगमुक्त, भयमुक्त कसा राहील यासाठी प्रयत्न करुयात, असे आवाहन त्यांनी पोलिस सहकाऱ्यांना केले आहे. दिवसाची रात्री अन रात्रीचा दिवस करत पोलिस अधिकारी व कर्मचारी कोरोनाच्या संकटात रस्त्यावर उभे आहेत. दिवसेंदिवस शहरात कोरोनाचाप्रादुर्भाव वाढतो आहे. पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तरी देखील कर्तव्यापुढे आपल्या जीवाची पर्वा न करता पोलिस खंबीरपणे लढा देत आहेत............खऱ्या अर्थाने समाजसेवा करायची वेळआपल्यापैकी बऱ्याच जणांना नोकरीला लागताना मुलाखतीच्या वेळी तुम्ही पोलिस दलात का सहभागी होणार आहात असा विचारलेला प्रश्न तुम्हाला आठवत असेल, त्याचे सरधोपट उत्तर मला समाजाची सेवा करायची आहे असे दिलेले आठवत असेल.त्याच उत्तराला आता जागण्याची वेळ आता आली आहे. असे आयुक्तांनी या पत्रात म्हटले आहे.