इंदापूर : इंदापूर तालुक्यात कधी पडला नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामध्ये तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही लोकांना मदत मिळाली, मात्र अनेक नुकसानग्रस्तांची शासकीय मदत महसूल खात्यात पडून असून, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या सत्तरा हजार शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी इंदापूर तालुका भारतीय काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी केली आहे.
याबाबत इंदापूर तालुका काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, जिल्हा सरचिटणीस जकिरभाई काझी, शहराध्यक्ष चमनभाई बागवान, भगवान पासगे, निवास शेळके, प्रदीप शिंदे, राहुल वीर, महादेव लोखंडे, युवक जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास पाटील, मिलिंद साबळे, डॉ. संतोष होगले, विकास बनकर उपस्थित होते.
स्वप्नील सावंत म्हणाले की, इंदापूर तालुक्यात अंदाजे ३४००० नागरिकांना शासनाची आर्थिक मदत आलेली आहे. त्यातील एकूण १७००० नुकसानग्रस्तांना दिवाळीमध्ये जवळपास ९ कोटी रुपयांची मदत त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. मात्र त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे जानेवारी २०२१ मध्ये ९ कोटींची मदत आली आहे. त्यामध्ये पण काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप नुकसानग्रस्तांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.
नुकसानग्रस्तांच्या यादीत इंदापूर तालुक्यातील एकूण ५६ गावांचा व जवळपास १७ हजार लोकांचा समावेश आहे. त्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी संबंधित प्रशासनासोबत आमची चर्चा झाली असून, येणाऱ्या १५ दिवसांत सर्व पैसे नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
इंदापूर तहसील कार्यालयाच्या वतीने एक महिन्यापूर्वीच इंदापूर तालुक्यातील एकूण १७ हजार नुकसानग्रस्तांना शासनाची जवळपास ९ कोटी रुपयांच्या, आर्थिक मदतीचे धनादेश स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिले आहेत. त्यांना आपण तालुक्यातील १७ हजार लाभार्थ्यांच्या खाते नंबरसह याद्या दिल्या आहेत. मात्र त्यांना नवीन यंत्रणा आल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत. त्यांना आपण सोमवारपर्यंत वेळ दिला असून, पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत तर पुढील निर्णय घेण्यात येईल असे बजावले आहे.
अनिल ठोंबरे
निवासी नायब तहसीलदार, इंदापूर
०५ इंदापूर काँग्रेस
इंदापूर तहसील कार्यालयात महसूल प्रशासनासोबत चर्चा करताना काँग्रेस कार्यकर्ते.