लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चोरीला गेलेल्या कारच्या विम्याची रकमेपोटी मालकास ५ लाख १२१ रुपये आणि नुकसानभरपाई म्हणून २५ हजार रुपये देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीने विमा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे ग्राहकाने मंचाकडे धाव घेतली.
आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितिजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. याबाबत प्रियामोल टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे अमोल तरटे (रा. चिंचवड) यांनी विमा कंपनीविरोधात आयोगात तक्रार दिली होती. तरटे यांनी २०१५ साली सात लाख रुपयांना स्विफ्ट डिझायर कार खरेदी केली होती. संबंधित कार परवानाधारक किरण पाटील चालवत. पाटील यांना २७ फेब्रवारी २०१६ रोजी एक फोन आला व समोरील व्यक्तीने त्यांना नेवासा येथे जायचे असे सांगितले. त्यानुसार आरुफ व इतर व्यक्ती यांना घेऊन पाटील हे नेवासा येथे जाण्यास निघाले. प्रवासादरम्यान पाटील यांनी कार जेऊर टोल नाक्याच्या पुढे लघुशंकेसाठी थांबवली. त्यावेळी त्यांच्या गाडीत असलेल्या व्यक्तींनी पाटील यांना त्याच ठिकाणी सोडून कार व त्यांच्या मोबाइलची चोरी केली. याबाबत अहमदनगरमधील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
तरटे यांनी कारसाठी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा घेतला होता. कार चोरीला गेली म्हणून त्यांनी ७ लाख ५० हजार रुपये आणि तक्रारखर्चापोटी ५० हजार रुपये मिळावे, अशी मागणी करणारी तक्रार विमा कंपनी विरोधात आयोगात दाखल केली होती. दरम्यान, पाटील जेव्हा कारमधून उतरले तेव्हा त्यांनी गाडीची चावी बरोबर घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ती गाडीलाच ठेवली. तक्रारदार यांनी विम्याच्या अटी व शर्तींचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांचा दावा तक्रारखर्चाच्या मागणीसह नामंजूर करावा, असा जबाब विमा कंपनीने दिला होता.